सोलापुरात शिवसेनेच्या ‘शहर मध्य’वर भाजप करणार दावा ! राम सातपुते यांना मिळालेल्या मतांमुळे चर्चेला उधाण
सोलापूर : सोलापूर लोकसभेची निवडणूक आठवणीत राहणारे ठरली आहे. काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते या दोन्ही नेत्यांमध्ये या मतदारसंघात तगडी फाईट झाली परंतु देशात बदललेले वातावरण, मोदीविरोधी सुरू झालेली लाट आणि सलग तीन वेळा बदललेला उमेदवार यामुळे सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीला नाकारले. परंतु राम सातपुते यांनी अतिशय चांगली लढत या निवडणुकीत दिली.
भाजपने शेवटच्या टप्प्यावर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला आणि मते मागितली. त्यामुळे चुरशीने मतदान झाले परंतु सोलापुरात वाढलेली मुस्लिम समाजाची मते, मराठा समाजाने भाजपकडे फिरवलेली पाठ, थोड्याफार प्रमाणात लिंगायत समाज सुद्धा काँग्रेसकडे झुकला, आंबेडकरी समाजाची बऱ्यापैकी मते काँग्रेसला मिळाली, धनगर समाज ही 50-50 झाला. त्यामुळे प्रणिती शिंदे यांचा 75000 हजाराच्या फरकाने विजय झाला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वांचे लक्ष सोलापूर शहर मध्य या मतदारसंघावर लागले होते. आमदार प्रणिती शिंदे यांचा तो बालेकिल्ला मानला जातो. मागील पंधरा वर्षापासून त्या आमदार आहेत त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसला किमान 20 ते 25 हजाराचे मताधिक्य प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी अपेक्षित ठेवले होते परंतु झाले उलटेच शहर मध्य मधून केवळ 790 मताचे मताधिक्य काँग्रेसला मिळाले आहे.
या मतदारसंघात पद्मशाली समाज, लोधी समाज, ब्राह्मण समाज, वडार समाज, बेडर समाज यासह हिंदुत्ववादी असलेल्या मोची समाजातील युवकांनी भाजपला मतदान केल्याचे बोलले जात आहे तसेच सोलापुरातील सेटलमेंट हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो परंतु त्या ठिकाणीही भाजपने सुरुंग लावला होता. काही प्रमाणात तिथली मतेही भाजपला मिळाली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसचे मताधिक्य घटले. भाजपच्या राम सातपुते यांना तब्बल 89 हजार 672 इतकी मते मिळाली आहेत. थोडक्यात पाहायला गेले तर या मतदारसंघातील मुस्लिम समाज आणि आंबेडकरी समाज तसेच काही प्रमाणात मोची समाजाने काँग्रेसला तारले असे म्हणावे लागेल.
सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्ष असेल, इंडिया आघाडी कडून आडम मास्तर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघात मागील तीन वेळा शिवसेनेने निवडणूक लढवली मात्र तीस ते पस्तीस हजाराच्या वर गेले नाहीत. आडम मास्तर, एम आय एम, काँग्रेसमधून होणारी संभाव्य बंडखोरीची शक्यता असल्याने मत विभाजनामुळे आणि हिंदुत्ववादी मते पाहिली तर भाजपला हा मतदारसंघ सेफ वाटतो.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये ऍडजेस्टमेंट होऊन शहर मध्य भारतीय जनता पार्टीकडे मिळू शकतो अशी शक्यता असून सुशीलकुमार शिंदे यांनी मतदारसंघ सोडला की तो विरोधकांच्या ताब्यात जातो असा इतिहास आहे. आता प्रणिती शिंदे या सुद्धा खासदार झाल्याने त्यांच्या मतदारसंघात विरोधी पक्षाचा आमदार होणार का याकडेही लक्ष असून ऐनवेळी राम सातपुते जर मध्य मधून उमेदवार म्हणून आले तर नवल वाटायला नको.