सोलापुरात अजित पवारांच्या शासकीय बैठकीकडे भाजप आमदारांनी फिरवली पाठ
सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार हे महायुतीच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रथम सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे रे नगर येथील हेलिपॅडवर आगमन झाले त्यानंतर ते सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि ठरलेल्या वेळेनुसार साडेदहा वाजता नियोजन भवन या ठिकाणी ते बैठकीला हजर झाले.
नियोजन भवन मध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने, अपक्ष आमदार संजयमामा शिंदे हे दोनच आमदार उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. त्या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, महापालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.
अजित पवार हे राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री असताना सोलापूरच्या विविध विकासकामांच्या निधीचा प्रश्न असताना सोलापूर जिल्ह्यातील भाजप आमदार या बैठकीला उपस्थित राहणे गरजेचे आहे परंतु पवारांच्या या महत्त्वाच्या बैठकीला सोलापुरातील भाजपचा एकही आमदार उपस्थित नव्हता हे सोलापूरचे दुर्दैव म्हणाव लागेल.