भाजप नेत्यांनी आणला तब्बल ९६६ कोटीचा निधी ; सोलापूरचा हा विषय लवकरच मार्गी लागणार
सोलापूर : सोलापूर शहरातील उड्डाणपूलाच्या सुधारित प्रस्तावासाठी ९६६.२४ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होण्याकरिता पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
२०१५ साली सोलापूर शहरासाठी जुना पुणे नाका ते पत्रकार भवन तसेच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाणपूल मंजूर झाले आहेत. उड्डाणपूल मंजुर होऊन ९ वर्षे उलटली तरीही तांत्रिक कारणांमुळे उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला विलंब लागत होता. नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशन काळात आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन उड्डाणपुलाच्या कामासाठी निधी आणि इतर बाबींची पूर्तता करण्याची मागणी केली होती. तसेच आमदार देवेंद्र कोठे यांनी अधिवेशनात उड्डाणपूलाबाबत लक्षवेधीही मांडली होती. ९०% भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया होऊनही दोन्ही उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. ते कधी सुरू होणार ? असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसेच नगरविकास खात्याने सकारात्मक उत्तर देत लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याकरिता शासनस्तरावरून प्रयत्न होतील, असे सांगितले होते.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शहरातील दोन्ही उड्डाणपूलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनीही उड्डाणपुलाच्या निर्मिती प्रक्रियेला वेग येण्यासाठी नियमित पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलासाठी ९६६.२४ कोटी रुपये दिले आहेत. आता उर्वरित भूसंपादन आणि तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या निर्मितीची प्रक्रिया मूर्त स्वरूपात येणार आहे.
————–
मे अखेर निघणार निविदा
उड्डाणपुलासाठी उर्वरित भूसंपादन पूर्ण करुन मेअखेर सुधारित उड्डाणपूलासाठीची निविदा निघणार आहे, असे दिल्लीस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोलापूर महानगरपालिकेला कळवले आहे.
————-
६ ठिकाणी प्रवेश आणि निर्गमन रॅम्प
सोलापूर शहरातून जाणाऱ्या उड्डाणपूलाला ६ ठिकाणी प्रवेश आणि निर्गमन रॅम्प असणार आहेत. तसेच दोन सर्व्हिस रस्तेही असणार आहेत.
—————–
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला
विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रासह सोलापूरकरांना ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असे म्हणत
विकासाचे अभिवचन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळत उड्डाणपुलासाठी ९६६.२४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. त्याबद्दल दोघांचेही आभार मानावे तितके कमी आहेत. याकामी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनीही शासनाकडे पाठपुरावा केला. या सर्वांचे समस्त सोलापूरकरांतर्फे आभार.
— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य