
बसवनगर पोलीस पाटीलचा सोलापूर विद्यापीठात “पक्षी जलपात्र” सामाजिक उपक्रम
” झळा वाढल्या उन्हाच्या, तहान भागवू पक्षांच्या* ” ही घोषणा देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पाचशे एकराच्या परिसरात पक्षी-जलपात्र उपक्रम राबविण्यात आले.यावेळी पक्षी मित्र पोलीस पाटील प्रविण राठोड, प्रा.डॉ.राजेंद्र वडजे (संचालक-राष्ट्रीय सेवा योजना सोलापूर विद्यापीठ),प्राध्यापक वर्ग व विध्यार्थी-विध्यार्थीनी यांच्या हातून शेतातील अनेक झाडांवर पक्षी-जलपात्र बांधून पाण्याची व्यवस्था करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

जसजसे दिवस जात आहे,तसतसे तापमानाचा पारा अधिक आग ओकात आहे.यामुळे माणसांचेच काय तर पशु पक्षांचे अतोनात हाल होत आहे. बसव नगरचे पोलीस पाटील प्रवीण राठोड आपल्या “पक्षी जलपात्र” उपक्रमात सांगतात की, नैसर्गिक पाण्याचे सर्व स्त्रोत पूर्णपणे आटले आहेत. यामुळे चिमणी आणि इतर पक्षांचे पाण्याअभावी अत्यंत बिकट हाल होत आहेत. हे आपण आपल्या परिसरात पाहत आहोत.
पाण्याने तहानलेल्या चिमण्या,पक्षी बेशुद्ध अवस्थेत पडलेले आपण पाहत असतील. जाणकारांच्या मते चिमण्या,पक्षांना पाणी न मिळाल्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन आकाशात उडता-उडता अचानक जमिनीवर पडतात अथवा तारेमध्ये अडकून मृत्युमुखी पडतात अशा एक ना अनेक कारणामुळे चिमणी,पक्षी गंभीररित्या आपला जीव गमावतात. माणसांचे उन्हाळ्यात पाण्याविना लाही-लाही होते तर चिमुकल्या पक्षांची काय वणवा होत असेल,मैल न मैल पाण्याची व्यवस्था नसल्याने रानातील पक्षांची काय दुरवस्था/हाल होत असेल याची कल्पना नाही केलेली बरी.
ऊन्हाळ्यामध्ये पक्ष्यांची होणारी दुरावस्थेची कल्पना करून बसवनगरचे (दक्षिण सोलापूर) पोलीस पाटील पक्षी मित्र प्रविण राठोड यांनी गाव परिसरात व आजूबाजूच्या गावात, नळदुर्ग जिल्ह्यात चिमणी,पक्षांना पाण्याची सोय व्हावी यासाठी “पक्षी जलपात्र” हा सामाजिक उपक्रम गेल्या पाच वर्षापासून पोलीस पाटील मानधनातील तीन महिन्याचे मानधन पक्षी-जलपात्र उपक्रमासाठी खर्च करून उपक्रम राबवत आहेत ते आजपर्यंत 2500 (दोन हजार पाचशे) “पक्षी-जलपात्र” वाटप केले आहेत.*
यासाठी ते स्वतः माठाचे पक्षी जलपात्र तयार करून घेऊन जिथे पाण्याची व्यवस्था नाही अशा वाड्या-वस्त्यावर, शासकीय कार्यालयात, कॉलेजमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये, पोलीस स्टेशन आवारात, तहसील आवारात, ग्रामीण रुग्णालय परिसरात, विद्युत पारेषण कार्यालय परिसरात अशा अनेक ठिकाणी पक्षी येतील अशा ठिकाणी जलपात्र बांधून दोन दिवसात एकदा जलपत्रात पाणी ठेवण्याची विनंती करत आहेत.
प्रत्येकाने स्व-इच्छेने चिमणी,पक्षी बचाव चळवळ उभी करून प्रत्येक कुटुंबाने आपली प्रमुख जबाबदारी समजून चिमणी पक्षांना पाण्याची सोय व्हावी यासाठी प्रत्येकाने आपल्या घरासमोर,छतांवर,झाडांवर पक्षी जलपात्र ठेवून निसर्गातील जीवांची काळजी घ्यावी, जेणेकरून निसर्गातून लुप्त होत चाललेली अनेक प्रकारे किलबिल करणारी मधुर नैसर्गिक संगीत ऐकावयास मिळेल.
यासाठी पोलीस पाटील प्रविण राठोड स्वतः हाताने माठाचे पक्षी जलपात्र तयार करून मोफत भेट देत आहेत,जेणेकरून उन्हाळ्यात चिमणी,पक्षी जलपात्रातील थंड पाण्याने आपली तहान भागवतील व पाण्याविना होणारे चिमण्या,पक्षांचे प्राण वाचण्यास मदत होईल या भावनेने हे उपक्रम राबवत असल्याचे ते सांगतात… !