बंजारा समाजातील आणखी एक नेता दक्षिणच्या मैदानात ; राष्ट्रीय बंजारा समाजाची ताकद सोबतीला
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षांकडून इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये आता आणखी एका नेत्याची भर पडली असून बंजारा समाजातील अशोक चव्हाण हे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. चव्हाण यांच्या पाठीशी राष्ट्रीय बंजारा परिषदेची ताकद असल्याचे समोर आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर काँग्रेस पक्षाकडून अनेक नेत्यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यानंतर भाजप कडून ही इच्छुकांची संख्या वाढली. आता अपक्ष लढण्याची तयारी अनेक जण करीत आहेत.
अशोक चव्हाण हे सध्या संत सेवालाल महाराज बंजारा लमाण समृध्दी योजनेचे अशासकीय सदस्य आहेत. तसेच राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम करीत आहेत. मागील पंचवीस वर्षापासून चव्हाण हे राजकारण आणि सामाजिक कार्यात आपले योगदान देत आहेत. सध्या बंजारा समाजातील तांड्यांचा विकास यावर त्यांचे युद्धपातळीवर काम सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर विधानसभा आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तांड्यांची संख्या असून दक्षिण मध्ये सुमारे 40 ते 45 हजार बंजारा समाजाच्या मतदारांची संख्या आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय नेते किसन भाऊ राठोड आणि महासचिव पंडित राठोड यांचा आदेश आला तर निश्चित दक्षिण सोलापूर विधानसभेच्या मैदानात आपण उतरणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.