अरे बाबा ! अजितदादा राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला मिस्त्रींची उपस्थिती ! नजीब शेख यांनी पूरग्रस्तांच्या आरोग्याची घेतली अशी काळजी
सोलापूर : सीना नदीला आलेला महापूर सद्या ओसरत आहे. यादरम्यान अनेक गावांमध्ये आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन नुकतच काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले सोलापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांनी दक्षिण सोलापूर येथील वांगी गावात आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे.
या आरोग्य शिबिराचं उद्धाटन आरोग्य सेवक बाबा मिस्त्री यांनी केलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रहारचे नेते जमीर शेख, अजित बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. हाफिज जुनैदी, डॉ. जुवेरिया जुनैदी यांच्या मेडिकल टीमने गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यावेळी १५० हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. उद्या शनिवार रोजी देखील हे आरोग्य शिबीर सुरू राहणार असल्याची माहिती नजीब शेख यांनी दिली असून सर्व गावकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
दरम्यान महापालिका निवडणूक जवळ आल्याने बाबा मिस्त्री हे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेस पक्षाने तर निवडणूक निरीक्षकांच्या यादीत बाबा यांचे नाव घेतले होते. त्यामुळे निवडणुकीत बाबा हे प्रहार सोडणार हे तर जवळ जवळ निश्चित मानले जाते. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली, त्यामुळे शेजारी तौफिक शेख असल्याने ते वातावरण पाहता ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.


















