जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासनाचे कौतुकास्पद कामगिरी!
सोलापूर, दिनांक 19(जिमाका):-या आषाढी वारीत आषाढी एकादशीला किमान 15 लाख वारकरी भाविक पंढरपूर शहरात येऊ शकतात याचा अंदाज घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सिडेंट कमांडर, जिल्हा नगरपालिका प्रशासन व पंढरपूर नगरपरिषद यांनी पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहराचे पाच भाग करून या पाच भागात स्वच्छता, शौचालयाची व्यवस्था, शौचालय साफसफाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, सक्शन मशीन तसेच अन्य आवश्यक साधनसामग्री यांचे सूक्ष्म नियोजन करून अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबवली व ‘स्वच्छ वारी निर्मळ वारी’चा प्रत्यय वारकरी, भाविकाना आणून दिला. येथे येणाऱ्या भाविकांनी स्वच्छतेच्या सुविधेबद्दल अत्यंत समाधान व्यक्त तर केलेच परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वच्छतेच्या कामाचे कौतुक केले होते.
या पाच भागांमध्ये स्वच्छतेची धुरा सांभाळण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांनी ब्रांच डायरेक्टर ऑफ हायजिन म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी विना पवार यांची नियुक्ती केली. त्यांच्या अंतर्गत पाच वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 13 मुख्याधिकारी हे स्वच्छता नोडल अधिकारी म्हणून नेमले होते .या परिसरात चंद्रभागा वाळवंट, पत्रा शेड परिसर ,65 एकर परिसर, प्रदक्षिणामार्ग व मंदीर परिसर, बसस्थानक , अर्बन बँक असे 5 भाग करण्यात आले होते.
स्वच्छतेच्या दृष्टीने चंद्रभागा वाळवंट हा सर्वात आव्हानात्मक भाग असल्यामुळे तेथे एकूण सात भागात सात मुख्याधिकारी नेमले होते. प्रत्येक मुख्याधिकारी यांच्याकडे शहर समन्वयक , शहर अभियंता, स्वच्छता निरीक्षक,नप लिपिक तसेच सफाई कर्मचारी अशी प्रत्येकी वीस जणांची टीम नेमलेली होती. या कामाकरीता 50 स्वयंसेवकांनी सुद्धा मदतीचा हातभार लावला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी पूर्वी सोयीसुविधाचे पाणी करताना चंद्रभागा वाळवंटात स्वच्छतेच्या दष्टीने आणखी मनुष्यबळ वाढवण्याबाबत सुचित करण्यात आले होते तसेच चंद्रभागा नदीकडेच्या दोन्ही बाजूचे स्वच्छता वेळोवेळी करून संपूर्ण वाळवंट स्वच्छ राहील याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याप्रमाणे प्रशासनाने अत्यंत चोखपणे नियोजन करून वाळवंट परिसर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
चंद्रभागा वाळवंट परिसरात भाविक मोठया प्रमाणात येतात, या परिसरात वारकऱ्यांना, भाविकांना, महिलांना स्वच्छतेची सुविधा देण्याकरता एकूण 400 तात्पुरते शौचालय उभारले गेले होते ,पूर्ण शहरात एकूण 2000 तात्पुरते शौचालय उभारले गेले होते,या शौचालयाची वारंवार स्वच्छता, निर्जंतुकीकरण त्यातील मैलाचे सक्शन तसेच शौचालयासाठी पाण्याचा पुरवठा व हँडवॉशची सुविधा व वारंवार स्वच्छता करून घेण्यासाठी या सर्व मुख्याधिकारी व त्यांच्या जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली तर पंढरपूर मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी सर्व पथकास आवश्यक साधनसामग्री अत्यंत तत्परतेने उपलब्ध करून दिली.
स्वच्छता व ओडीएफ टीमचं काम सकाळी चार ते दहा ,दहा ते सायंकाळी सहा व सायंकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत चालायचं .उघड्यावर कोणीही शौचास बसू नये म्हणून शिट्ट्यांचा वापर करून, कधी समजून सांगून ,भाविकांना, वारकऱ्यांना महिलांना शौचालयाचा, वापर करावा अशी जनजागृती या पथकाने केली आणि खऱ्या अर्थाने या वर्षीची आषाढी वारी 2024 ही स्वच्छ वारी
निर्मळ वारी आणि ओपन डेफिनेशन फ्री चंद्रभागा वाळवंट या संकल्पना आपल्याला सत्यात उतरताना दिसल्या.
या उपक्रमात बाळासाहेब चव्हाण बार्शी मुख्याधिकारी,दयानंद गोरे अकलूज मुख्याधिकारी, सुधीर गवळी सांगोला मुख्याधिकारी,चरण कोल्हे मंगळवेढा मुख्याधिकारी,माधव खांडेकर नातेपुते मुख्याधिकारी,अतिश वाळुंज मैंदर्गी मुख्याधिकारी, योगेश डोके मोहळ मुख्याधिकारी, सचिन तपसे करमाळा मुख्याधिकारी, सचिन पाटील अक्कलकोट मुख्याधिकारी,परिविक्षाधीन मुख्याधिकारी यमाजी धुमाळ ,सतीश चव्हाण ,मनीषा मगर ,प्रियंका शिंदे,यांनी आपापल्या टीम सोबत सदर कामगिरी पार पाडली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व टीमचे नेतृत्व श्रीमती विना पवार यांनी करून पंढरपूर शहराची स्वच्छता दर्जेदार राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.
जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारी 2024 च्या प्रत्येक बाबीवर अत्यंत कटाक्षाने नियंत्रण ठेवले होते. वारीचे मागील दोन महिन्यापासून तयारी करत होते व दिनांक 11 जुलै 2024 पासून पंढरपूर शहरात मुक्काम करून प्रत्येक शासकीय यंत्रणेशी समन्वय ठेवून त्यांच्या जबाबदारीची त्यांना जाणीव करून देऊन त्यांच्याकडून उचित काम करून घेण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिल्याने व त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना त्यांची जबाबदारी मुक्तपणे पूर्ण करण्यास वाव दिल्याने सर्वांनी अत्यंत उत्साहाने दिले जबाबदारी चोखपणे पार पाडून आषाढी वारी 2024 यशस्वी केली.
अनेक लोकप्रतिनिधींनी व प्रत्यक्ष वारकरी, भाविकांनी प्रशासनाने दिलेल्या सोयीसूविधाबद्दल व स्वच्छतेबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. त्यापैकीच जिल्हा नगरपालिका प्रशासन व जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्यांनी पंढरपूर शहर तसेच पालखी मार्गावरील नगरपालिकांची स्वच्छतेबाबत खूप चांगले काम केल्याने पालखी प्रमुख, दिंडी प्रमुख व वारकरी यांचे समाधान झालेले दिसून येत आहे.