एंजलवनच्या सहकार्याने राह फाउंडेशनच्या सोलापूर सेंटरतर्फे भव्य नोकरी मेळावा आणि प्रमाणपत्र वितरण समारंभ
सोलापूर (प्रतिनिधी) एंजलवनच्या सीएसआर निधीतून राह फाउंडेशनच्या अंतर्गत सेवा फाउंडेशन, सोलापूर सेंटरच्या ६वी, ७वी आणि ८वी बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रमाणपत्र वितरण समारंभ व नोकरी मेळाव्याचे आयोजन समाज कल्याण हॉल, सोलापूर येथे करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश होता.
समर्थ कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत युवकांना संपूर्ण ज्ञान, संवाद कौशल्ये आणि रोजगारक्षमतेसाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी दिशा देणे हा होता. प्रमाणपत्र वितरण समारंभात प्रसिद्ध वर्तमानपत्राचे उपसंपादक आणि मुख्य अतिथी भरतकुमार मोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी एंजलवन कंपनीच्या योगदानाबद्दल विशेष आभार मानण्यात आले.
या नोकरी मेळाव्यात सोलापूर शहरातील प्रतिष्ठित कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ग्रे व्हाईट, सिसूर सृष्टी एंटरप्रायजेस आणि ओला इलेक्ट्रिक व्हेइकल्स या प्रमुख कंपन्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीच्या संधी देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे आयोजन राह फाउंडेशनचे शुभम खरात (सिनीयर मॅनेजर, स्किल डेव्हलपमेंट), अश्विन साखरे आणि अंतर्गत सेवा फाउंडेशनचे विवेक यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती मनिषा वाघमारे यांच्या प्रास्ताविकाने झाली, तर संपूर्ण सूत्रसंचालन मानसी गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शीतल कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या उपक्रमात एकूण ६५ विद्यार्थी उपस्थित होते, त्यापैकी ४७ विद्यार्थ्यांची पूर्वनियोजित यादी तयार झाली आणि ३२ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या. राह फाउंडेशन आणि एंजलवन यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. शिक्षण आणि रोजगार यामधील दरी कमी करण्याच्या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमामुळे युवकांना करिअरसाठी महत्त्वाच्या संधी उपलब्ध झाल्या.
भरतकुमार मोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना एंजलवन कंपनीच्या मदतीने सोलापूर सेंटर उभारण्यात आले असून त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचे सांगितले.
राह फाउंडेशनचे शुभम खरात यांनी विद्यार्थ्यांना जोहरी खिडकी आणि इकिगाई संकल्पनांद्वारे आत्मविश्लेषण करून योग्य करिअर निवडण्याचे आवाहन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच निखिल यांनी ग्रे नाईट कंपनीविषयी माहिती देऊन संवाद कौशल्ये आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेलसारख्या तांत्रिक कौशल्यांच्या गरजेवर भर दिला. सनसूर सृष्टी खादी ग्रामोद्योग चे अब्बास यांनी आपल्या कंपनीविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मुलाखतींसाठी संधी दिली. तसेच ओला इलेक्ट्रिक व्हेइकल्स शोरूमचे आदित्य यांनीही आपल्या कंपनीविषयी माहिती देत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्याचा मार्ग खुला झाला आहे. राह फाउंडेशन भविष्यातही अशाच प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.