




सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा
सोलापूर — सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभाग तसेच DAY-NULM यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या “महिला महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम २०२६” या भव्य महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आज इंद्रभुवन परिसर, सोलापूर येथे उत्साहात पार पडला.
या महोत्सवाचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, गटनेते वाहिदा बानो शेख, गटनेते अमोल शिंदे, चेतन नरोटे, गटनेते वैभव हातुरे, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, महिलांचे सक्षमीकरण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे मुख्य आधार आहे. महिलांनी शिक्षण, उद्योग, कला आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजाच्या प्रगतीत मोठा वाटा उचलला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून अशा महोत्सवांमुळे महिलांच्या कौशल्याला व कर्तृत्वाला व्यापक व्यासपीठ मिळते, असे त्यांनी सांगितले.
या महिला महोत्सवामध्ये शहरातील तब्बल ४० महिला बचत गटांनी सहभाग घेत आपल्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स उभारले आहेत. यावेळी महापौर विनायक कोंड्याल तसेच उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत महिला बचत गटांच्या उपक्रमांची पाहणी केली तसेच त्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. महिला महोत्सवाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, महिला बचत गटांचे उपक्रम तसेच महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून हा महोत्सव दि. ०९ मार्च ते ११ मार्च २०२६ या कालावधीत इंद्रभुवन परिसर येथे पार पडणार आहे.


















