दादांच्या राष्ट्रवादीतून कुणाचा पत्ता होणार कट ; इच्छुक सारे अन् बदलाचे वारे जोरदार
सोलापूर : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उमेश पाटील यांच्या रुपात आक्रमक, अभ्यासू जिल्हाध्यक्ष मिळाला. उमेश हे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर सोलापूर शहरात सुद्धा इच्छुकांची संख्या वाढली असून पक्षात नव्याने येणाऱ्यांची अपेक्षा सुद्धा वाढू लागल्या आहेत.
सोलापूरचा मुस्लिम समाज आता बऱ्यापैकी दादांच्या राष्ट्रवादीकडे वळताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी आपल्या बऱ्याच समर्थकांसह प्रवेश केला त्या प्रवेशासाठी कुणी कुणी पुढाकार घेतला हे दिसून आले.
मागील काही महिन्यांपासून शहराच्या अध्यक्षपदाची सूत्रे संतोष पवार यांच्या हाती आहेत. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना हे पद देण्यात आले. भाऊ आपल्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करताना दिसते. भाऊंचा लाडका भाई जोडीला कार्याध्यक्ष आहे. या सर्वांचा भरणे मामा पालकमंत्री असताना सुवर्ण काळ होता. त्याचा भरपूर लाभ काही नेत्यानी घेतल्याचे पाहायला मिळाले.
आता शहरात बदलाचे वारे वाहताना पाहायला मिळते. माजी गटनेते किसन जाधव, तौफिक शेख, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, बिज्जू प्रधाने, इरफान शेख यांचे सह अनेक कार्यकर्ते पदासाठी इच्छुक असल्याचे समजते. प्रत्येकाने आपापल्या परीने फिल्डिंग ही लावली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी त्यांची भेट घेत दौऱ्याचे नियोजन केल्याचे दिसून आले.
आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेश पाटील, राजन पाटील यशवंत माने यांचे स्वतंत्र गट असून तौफिक शेख हे पक्षात आल्याने आता त्यांचाही स्वतंत्र गट होताना दिसत आहे. किसन जाधव आणि आनंद चंदनशिवे मात्र सर्वांना धरून आहेत. सोलापूर मध्ये निश्चितच संघटनात्मक बदल होणार असल्याची चर्चा असून भाऊ आपले अध्यक्ष पद टिकवण्यात यशस्वी राहतात की कार्यकर्ते त्यांना हटवून दुसऱ्यांना त्या पदावर बसवतात हे पाहणे ही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.