सोलापूरसाठी भाजपकडून बोगस दाखलेवाला उमेदवार नको ; या संघटना भेटल्या केंद्रीय न्यायमंत्री अर्जुन मेघवाल यांना
सोलापूर लोकसभा अनुसूचीत मतदार संघातून भाजपकडून उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता मतदार संघाला लागून राहिली आहे.सोलापूर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे विद्यमान खासदार डॉ.जयसिद्धेवर शिवाचार्य स्वामी यांची कारकीर्द फारशी प्रभावी राहिली नाही, त्यामुळे या मतदारसंघातील प्रश्न फारसे प्रभावीपणे मांडले गेले नाहीत. विकास खुंटला अशीच भावना जनमानसात सातत्त्याने व्यक्त होत आली आहे.
अशातच त्यांच्या अनुसूचित जातीच्या दाखवल्यावरून वाद उत्पन्न झाला, यात पुढे कोर्टबाजी देखील झाली. मात्र यामुळे या मतदार संघातील अनुसूचित जमातीच्या मतदार नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आली आहे. निवडणूक लढविण्यासाठी असे बोगस दाखले काढून जर अनुसुचित जाती उमेदवार पुढे आणले जात असतील तर तो मोठा अन्याय असल्याचेही म्हटले गेले. यातूनच आता भाजपकडून मतदार सोलापूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देताना सामाजिक दृष्टया मागसलेपणाचे चटके सहन केलेल्या अनुसूचित जाती उमेदवारासच भाजपने उमेदवारी दयावी अशी मागणी केंद्रीय न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे सोलापूर येथे आले असता विविध संघटनाच्यावतीने निवेदन देत करण्यात आली आहे.
यावेळी सोलापूर लोकसभा समन्वयक माजी खासदार अमर साबळे हेही उपस्थित होते. याबाबत विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगरसेवक डि .राज सर्वगोड यांनी अधिक माहिती दिली असून भाजपने सामाजिक दृष्टया मागसलेपणाचे चटके सहन केलेल्या खऱ्या अनुसूचित जात प्रमाणपत्र धारकास उमेदवारी द्यावी अशी मागणी केली.
विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे अध्यक्ष ऍड.रोहित एकमल्ली, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा युवक अध्यक्ष शैलेश आगवणे, अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरु दोडिया, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष अमोल घोडके, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष विशाल तुपसौदर, जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक सुरेश नवले, भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव नितीन काळे, अभाविपचे प्रतीक कुंभारे, अक्षय राजहंस, राज लांडगे, संजय सातपुते, प्रथमेश सर्वगोड यांच्यावतीने निवेदन देत करण्यात आली आहे.