काँग्रेस वाट पाहतो जिल्हाध्यक्षांची ; प्रदेशाध्यक्षांना गांभीर्य नाही का? सोलापुरात कार्यकर्ते करू लागले चर्चा
सोलापूर : यंदाची लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्षासाठी अतिशय आव्हानात्मक आहे. पक्ष अडचणीत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत स्वतःला झोकून देऊन काम करण्याची गरज आहे. असे असताना सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष आपल्या जिल्हाध्यक्षांची वाट पाहत असल्याचे चित्र आहे. याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्षांचा विषय गांभीर्याने घ्यावा अशी चर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळत आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे सध्या अडचणीतून जात आहेत. त्यांच्यावर अकलूज मध्ये गंभीर गुन्हा दाखल झाला आहे, त्या प्रकरणात जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे त्यामुळे तर त्यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे.
काँग्रेस पक्षाचे लोणावळ्यामध्ये दोन दिवस राज्यस्तरीय शिबिर झाले तिथेही जिल्हाध्यक्ष नव्हते, सोलापुरात शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचा संयुक्त दौरा झाला त्यातही जिल्हाध्यक्ष दिसले नाहीत, काही दिवसांपूर्वी पुणे येथे नव्हे राज्याचे प्रभारी यांनी बैठक घेतली तिथेही जिल्हाध्यक्षांची अनुपस्थिती जाणवली.
सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेल्या आमदार प्रणिती शिंदे या सध्या जिल्ह्यात दौरे करत आहेत परंतु या दौऱ्यात जिल्हाध्यक्ष पाहायला मिळत नाहीत. त्यांनी नेमलेले वरिष्ठ उपाध्यक्ष हे सुद्धा प्रणिती शिंदे यांच्या दौऱ्यात क्वचितच पाहायला मिळतात. आमदार शिंदे यांनी ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतल्याने त्याला जिल्हाध्यक्षांची साथ ही तितकीच महत्त्वाचे आहे असे कार्यकर्ते सांगताहेत.
लोकसभेच्या निवडणुका तोंडासमोर आहेत अशात बुथ यंत्रणा सक्षम करणे, बीएलओ नेमणे, मतदार यादीचे छाननी करून प्रसिद्धी करणे, निवडणुकीचे कार्यक्रम आखणे,अशी सर्वच कामे सध्या बंद असल्याचे समजते. जामीन फेटाळल्यानंतर आता जिल्हाध्यक्ष येतील का? अशी शंका व्यक्त केली जात आहे परंतु ह्या सर्व कामासाठी प्रभारी तर नेमणे गरजेचे आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची तर वाईट परिस्थिती दिसून येते.
लोकसभा निवडणुकीत जिल्हाध्यक्षांची भूमिका महत्त्वाची राहणार असून सोलापूरच्या जिल्हाध्यक्ष पदाचा विषय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गांभीर्याने घ्यावा अशी चर्चा आता काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत धवलसिंह मोहिते पाटील यांनी नेमलेल्या वरिष्ठ उपाध्यक्षांपैकी एकाकडे जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभारी पदभार द्यावा अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.