सोलापुरात भाजपला उमेदवार मिळेना ; चर्चेत येण्यासाठी माजी खासदार शरद बनसोडे महापालिकेत पत्रकारांच्या भेटीला
सोलापूर : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण ही कायमच चर्चा सोलापुरात ऐकण्यास मिळते. या निवडणुकीत सोलापुरातील स्थानिक उमेदवाराला संधी देण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांसह स्वतः सोलापूरकर ही करीत आहेत.
काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांनी रणसिंग फुंकल्याने भाजपला त्याच ताकदीचा उमेदवार द्यावा लागणार आहे. बाहेरून उमेदवार आयात करण्यापेक्षा सोलापुरातीलच ओरिजनल उमेदवार द्यावा या मागणीने आता जोर वाढला आहे.
एकूणच या पार्श्वभूमीवर 2014 च्या मोदी लाटेत निवडून आलेले माजी खासदार एडवोकेट शरद बनसोडे हे पाच वर्षानंतर पत्रकारांसमोर आले. महानगरपालिकेतील पत्रकारांसोबत बाकड्यावर बसून त्यांनी बऱ्याच गप्पा मारल्या निवडणूक जवळ आल्याने केवळ चर्चेत येण्यासाठी बनसोडे यांचा हा खटाटोप होता का? आता असे प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होऊ लागले आहेत.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीला आता उपरा उमेदवार कशाला, मी सक्षम उमेदवार आहे की. मला 2019 च्या निवडणुकीवेळी तुम्हाला थांबावे लागेल असे सांगण्यात आले. पक्षाचा आदेश मान्य करून मी बाजूला झालो परंतु यंदा बाहेरून उमेदवार मागवला जाईल अशी चर्चा आहे त्यापेक्षा मी स्थानिक सोलापूरचा आहे आणि शरद बनसोडे कोण आहेत हे सर्वांना माहीत आहे कुणाला सांगण्याची गरज नाही असे ते म्हणाले.
भाजप उपरा उमेदवार आणत असल्याने त्यांना गुदगुल्या होत आहेत परंतु यापूर्वी सौ. उज्वलाताई शिंदे यांचा पराभव झाला तसेच सुशीलकुमार शिंदे यांचा ही दोन वेळा पराभव झाला. त्यांच्यापेक्षा मोठ्या नेता होऊ शकत नाही आणि त्यांची सर आमदार प्रणिती शिंदे यांना येऊ शकत नाही असा टोलाही त्यांनी काँग्रेसला हाणला.