सोलापुरातून अमर साबळेंचे नाव आघाडीवर ; प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडीत एन्ट्री अन् भाजपचा मार्ग मोकळा
लोकसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वच पक्षांच्या उमेदवारीवरून निर्माण होणारी रंगत वाढत चालली आहे. अशातच सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून माजी खासदार अमर साबळे यांच्या नावाची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
२०१९ च्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहिलेल्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यंदाच्या निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीशी संधान बांधले आहे. परिणामी, सोलापुरात तिरंगी ऐवजी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत तब्बल पावणेदोन लाख मते मिळवणारे ॲड. प्रकाश आंबेडकर यंदा काँग्रेसच्या सोबत आघाडीमध्ये असल्यामुळे भाजपासमोर दलित मतांचे मोठे आव्हान आहे. परंतु भाजपाकडे माजी खासदार अमर साबळे यांच्या रूपाने दलित चेहरा असल्याने भाजपाची उमेदवारीची चिंता मिटल्याचे पक्षातून सांगण्यात येत आहे.
माजी खासदार अमर साबळे यांना राज्यसभेतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. पक्षनिष्ठ कार्यकर्ता ही असलेली ओळख ही अमर साबळे यांची सर्वात जमेची बाजू असल्याचे पक्षात बोलले जाते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे निवडणूक प्रमुख म्हणुन कार्य तसेच इतर अनेक भाजपा नेत्यांसोबत निवडणुकांचे व्यवस्थापन, प्रचाराची धुरा सांभाळणे, अनेक भाजप लोकप्रतिनिधींच्या विजयासाठी झोकुन देऊन काम करण्याची श्री. साबळे यांची पद्धत पक्षाला ज्ञात आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर पक्षश्रेष्ठींमध्ये चर्चेच्या फैरी झडत आहेत.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने मागीलवेळी डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी देऊ केली. सुरुवातीच्या काळात पारडे जड असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा परिणाम म्हणून दलित मतांच्या मोठ्या विभागणीमुळे पराभव पत्करावा लागला. यंदाच्या निवडणुकीत मात्र सुमारे पावणेदोन लाख मते घेणारे ॲड. प्रकाश आंबेडकरच महाविकास आघाडीच्या जवळ आल्याने काँग्रेसला याचा मोठा फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून अधिकाधिक लोकसभा सदस्य निवडून जावेत यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. अशावेळी दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अमर साबळे यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम सोलापूरसह राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघावर होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
विकासाची तळमळ, हिंदुत्व, संसदीय कामकाजाचा अनुभव, दलित समाजातील उच्चशिक्षीत, आश्वासक चेहरा, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क, सर्वांना सोबत घेऊन राजकारण करण्याची पद्धत, विकासकामांसाठी निधी मिळवण्याचे कौशल्य, दलित समाजासह सर्व समाज घटकांशी असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माजी खासदार अमर साबळे यांचे नाव कार्यकर्ते आणि नेत्यांमधून अग्रक्रमाने घेतले जात आहे. त्यामुळे प्रदेश भाजपाकडून माजी खासदार अमर साबळे यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता वाढली आहे.