सोलापूर काँग्रेसचा भटक्या विमुक्त जाती सेल भरकटलेला ; वाले गेले जाधव ही दिसेना
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने यंदा तब्बल 51 टक्के मतदान घेण्याचा विडा उचलला आहे. त्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू झालेली आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली असल्याने काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
काँग्रेस पक्षाला ही निवडणूक निश्चितच सोपी नाही. शिंदे साहेबांच्या दोन पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सोलापुरातील भटक्या विमुक्त जाती जमाती बहुतांश मतदार हा काँग्रेसच्या पाठीशी आहे. परंतू सध्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेल हा भरकटलेला अवस्थेत असल्याचे चित्र आहे.
सेलचे शहराध्यक्ष भारत जाधव हे काँग्रेस भवनात कमीच पाहायला मिळतात, प्रकाश वाले हे शहराध्यक्ष असताना जाधव हे कायम दिसायचे पण चेतन नरोटे हे अध्यक्ष झाल्यापासून ते दिसत नाहीत अशी चर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ऐकण्यास मिळते.
नुकतच भारत जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याचे दिसून आले, या फोटोमध्ये ते जरी समाजाचा विषय घेऊन गेले असले तरी तो फोटो काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. जाधव हे भाजपमध्ये जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या सोलापूर शहराध्यक्ष पदासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. एकूणच या सेलचे सध्याचे कामकाज पाहता आमदार प्रणिती ताई यांनी नवे पदाधिकारी निवडीचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत.