सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी होम मैदानावर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य आरोग्य शिबिरास भक्तांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे.
हे शिबिर दिनांक 14 ते 16 जानेवारी दरम्यान सकाळी 11 ते रात्री अकरा पर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, बालरोग तपासणी, दात, कान, नाक, घसा तपासणी, स्त्री रोग, त्वचा रोग, हृदयरोग आणि विविध आजारांची तपासणी आणि मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत.
सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत हे स्वतः या शिबिराच्या स्थळी सकाळपासून ठाण मांडून आहेत. त्यांच्या जोडीला जिल्हाप्रमुख अमोल शिंदे युवा जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे दिलीप कोल्हे, हरिभाऊ चौगुले, संजय सर्वदे राजकुमार शिंदे हे नेते असून या शिबिरास आरोग्य उपसंचालक डॉ राधाकृष्ण पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, जिल्हा शिल्लक चिकित्सक डॉक्टर सुहास माने यांची देखरेख सुरू आहे.
दरम्यान जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी या शिबिरा बाबत अधिक माहिती देताना गड्डा यात्रा पाहायला आलेल्या सोलापूरकरांनी या आरोग्य शिबिराचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन केले.