सोलापूर : मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. त्यासाठी सोलापुरातून पाच लाख मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
त्यापूर्वी सोलापुरात सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अशा दोन संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत होते,
त्यामुळे समाजात गट निर्माण झाले होते. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले होते. परंतु समाजाची एकी दिसावी यासाठी मनोज जरांगे यांनी समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार सोलापुरात आता या दोन्ही संघटना एकत्रित येऊन वेगळे नामकरण करण्यात आले असून त्याचे नाव आता सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चा असे झाले आहे.
या पत्रकार परिषदेत सर्वजण मतभेद मनभेद विसरून एकत्र आलो आहोत, येणाऱ्या 20 जानेवारी रोजी शहर व ग्रामीण भागातून सुमारे पाच लाख मराठा बांधव घेऊन जाण्यासाठी प्रयत्न असून त्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहोत अशी माहिती देण्यात आली.
येणाऱ्या 19 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची भेट निवेदन देणार का? या प्रश्नावर त्याचे नियोजन नंतर ठरविण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.
यावेळी पुरुषोत्तम बर्डे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पत्रकार परिषदेस माऊली पवार, अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, विनोद भोसले, नाना काळे, संजय शिंदे, श्रीकांत डांगे, अनंत जाधव, राजन जाधव, रवि मोहिते, प्रताप चव्हाण, शशी थोरात, नितीन गायकवाड, विजय पुकाळे यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे समाजातील ज्येष्ठ दास शेळके, राम जाधव हे मात्र यावेळी अनुपस्थितीत होते.