सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पहिल्याच दौऱ्यात त्यांच्या अंगावर शाई फेक झाल्यानंतर पोलीस प्रशासनाची चांगलीच गोची झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात पोलिसांनी अतिशय कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
पालकमंत्री पाटील हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत त्यांच्या दौऱ्यामध्ये सकाळी अकरा ते दुपारी एक ही वेळ शासकीय विश्रामगृहावर राखीव असून या वेळेत नागरिकांची निवेदने ते स्वीकारणार होते. पावणे बाराच्या दरम्यान त्यांचा ताफा जेव्हा शासकीय विश्रामगृहात आला तेव्हा पोलिसांनी याच ताफ्यात असलेल्या भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना गेटवर अडवले, त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. काळे सांगत होते मी शहराध्यक्ष आहे तरीही पोलीस ऐकत नव्हते परंतु त्यातील एका पोलिसांनी ओळखून काळे यांना आज जाऊ दिले.
पालकमंत्र्याला भेटायला आलेले नागरिक असेच शासकीय विश्रामगृहा बाहेर बराच वेळ थांबले होते कुणालाही पोलीस आत जाऊ देत नसल्याचे चित्र होते. पालकमंत्र्यांचे ओएसडी बाळासाहेब यादव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे फोन उचलत नाहीत अशी ओरड ही समोर आली आहे. “एवढीच भीती वाटते तर पालकमंत्री व्हायचे कशाला आणि सोलापूरला यायचेच नाही ना” असा नाराजीचा सूर एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पत्रकारांसमोर व्यक्त केला.