सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून प्रशासनाने सोलापूरचे एक प्रकारे मोठे नुकसान केलेले आहे. हजारो सभासद असलेले शेतकरी आणि शेकडो कामगारची गुजराण या कारखान्यावर अवलंबून आहेत. या साऱ्यांना सत्ताधाऱ्यांनी पराभुत केले आहे, आणि आपला स्वार्थी हेतु साध्य करुन घेतला आहे. वास्तविक पाहता सोलापूरात कोणताही मोठा उद्योग नाही की कारखानदारीही नाही, तरुणांच्या हाताला काम नाही, काम नसलेल्या हातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे, तरुण गुंडगिरी आणि व्यासनाधीनतेकडे वळू लागलेले आहेत.
आजतागायत सत्ताधाऱ्यांना एकही मोठा उद्योग सोलापुरात आणता आलेला नाही हे मोठे अपयश आहे, भूसंपादन झालेल्या बोरामणी विमानतळाचा विकास साधला असता तर सिध्देश्वरची चिमणी पाडण्याचा प्रश्नच उदभवला नसता. आणि शेतकर्यांसाठी पवित्र मंदिर म्हणून मोठ्या दिमाखात उभी असलेल्या या कारखान्याची चिमणी पाडण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. सदर कारखान्यातून इथेनॉल आणि या सारखे बरेच उत्पादनही होत होते यांमुळे आता उत्पन्नही घटनार आहे,
भविष्यात होटगी रोडच्या विमानतळावरून मोठे विमाने येऊ शकतील इतकेही मोठे हे विमानतळ नाही. भविष्यात याचा किती फायदा होणार आहे. हा सुध्दा संशोधनाचाच विषय उरला आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून बोरामणी विमानतळाचा विकास करणे अपेक्षित असताना शेतकर्यांच्या मंदिराचा कळस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर चिमणी पाडण्याचा घाट प्रशासन आणि राजकारण्यांनी घातला, हे जनतेच्या आणि विकासाच्या दृष्टीने योग्य नाही.
प्रशासनाने पुढील तारीख असूनही अगोदरच ही चिमणी पाडण्याचा घाट का? कुणाच्या सांगण्यावरून? की कोणत्या राजकीय खेळीतून? आता इतक्याशा क्षुल्लक कारणाने किती विमाने ये-जा करतील? सोलापूरचे दळणवळण यात किती विकास होईल? हे प्रश्न नक्कीच आतातरी अनुत्तरीतच आहेत. म्हणुन या घटनेचा एक सामान्य माणूस आणि एक भुमिपुत्र म्हणून मी निषेध करतो…
संतोष पवार,
संस्थापक अध्यक्ष
मार्ग फौंडेशन


















