राजकारणात आणि समाजकारणात अनेकांना अनेक गोष्टी वारसा हक्काने मिळतात. पण कर्तुत्व सिद्ध केल्याशिवाय नेतृत्व तयार होत नाही. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी सदस्या, आमच्या नेत्या आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी आपले कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करून दाखवले आहे. सोलापूरच्या कष्टकरी कामगारांचा, विडी कामगारांचा, महिलांचा आणि युवक युवतींचा आवाज बुलंद करणाऱ्या प्रणितीताईंनी आज काँग्रेसची ‘महाराष्ट्राची रणरागिणी’ अशी ओळख निर्माण केली आहे. लवकरच त्यांचा डंका देशाची राजधानी दिल्लीमध्ये घुमणार आहे.
देशाचे नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांचे बालपण अतिशय कष्टप्रद आणि अवहेलनेत गेले. आजच्या पिढीला या गोष्टी कळायला उशीर होईल. एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा देशाचा गृहमंत्री झाला. राज्यपाल आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही झाला. सोलापूर जिल्ह्याने एक उत्तुंग नेतृत्व देशाला दिले. पण शिंदे साहेबांनी आपला पुरोगामी विचार आणि गरिबांबद्दलची कणव कधीही दूर होऊ दिली नाही. हाच विचार आणि हेच विकासाचे धोरण समोर ठेवून आज प्रणितीताई विकासकामे करीत आहेत. निंबर्गी ता. दक्षिण सोलापूर या गावातून मी राजकारणाला सुरुवात केली. आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात काम सुरू केले. या काळात मला आदरणीय शिंदे साहेबांचे मार्गदर्शन होते. राजकारणात चढउतार असतात. या प्रत्येक काळात शिंदेसाहेब माझ्या पाठीशी राहिले. दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन मी शिंदे साहेबांना भेटत होतो. या कामांमध्ये मला आमदार प्रणितीताई शिंदे यांची साथ मिळाली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आरोग्याचे, रस्त्याचे, विजेचे आणि गोरगरिबांचे प्रश्न आम्ही प्रणितीताई पर्यंत पोहोचवले की त्या आमचा आवाज बनवून सरकारची भांडत असतात. सोलापूर शहर मतदारसंघात विविध जाती-धर्माचे लोक राहतात. टप्प्याटप्प्यावर प्रत्येकांचे प्रश्न, समस्या वेगळ्या आहेत. या सर्व समस्यांची आणि लोकांची प्रणितीताईंना पुरेपूर जाण असल्याचे आम्हाला सर्वांना दिसून येते. त्यामुळेच या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना सलग तीन वेळा निवडून दिले आहे. या मतदारसंघातील नागरिकांसाठी त्या अहोरात्र झटत असतात. सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न असो, विडी कामगारांच्या आणि यंत्रमागधारक कामगारांच्या समस्यांसाठीच्या मुंबईपासून दिल्लीपर्यंत पाठपुरावा करत असतात. सोलापूर शहराच्या विकासाचे त्यांच्याकडे मोठे व्हिजन आहे. विकास करताना कोणावरही अन्याय होऊ नये ही त्यांची भूमिका आहे. राज्यात आणि सोलापूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता नव्हती. पण संविधानाने दिलेल्या आंदोलनाचा मार्ग वापरून, प्रसंगी अधिकाऱ्यांवर धाक दाखवून त्यांनी या प्रशासनावर आणि महापालिका प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम केले. ही गोष्ट त्यांचे नेतृत्व किती भक्कम आहे हे दाखवून देते.
सोलापूरच्या महत्वाच्या प्रश्नावर त्या विधानसभेत आवाज उठवतात. त्यामुळे सरकारलाही त्यांच्या प्रश्नांची दखल घेऊन काम करावे लागते.
देशातील वातावरण सध्या खराब झाले आहे. देशातील सामाजिक समता कायम राहण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी सुमारे ४ हजार किलोमीटर पायी चालत भारत जोडो काढली. या पदयात्रेत आमदार प्रणितीताई शिंदे या राहुल गांधी यांच्या बरोबरीने चालल्या. आपल्या भाषणांमधून त्यांनी देश एकसंघ रहावा यासाठी मतदारांना काय करावे लागेल याची जाणीव करून दिली. या काळातच त्यांचे राष्ट्रीय नेतृत्व सिद्ध झाले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने त्यांना कार्यकारी समितीच्या निमंत्रक सदस्य म्हणून नियुक्त केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सूचनेवरून असताना पंजाब, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश येथील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी मिळाली. हा सोलापूरचा अभिमान वाढवणारी गोष्ट आहे. सोलापूर जिल्ह्याला आता एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांच्या काळात सोलापूरचे नाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजत होते. देशाच्या राजधानीमध्ये आणि सत्ता केंद्रामध्ये आपला हक्काचा माणूस होता. या सत्तेची फळे आज आपण सोलापुरात टप्प्याटप्प्यांवर बघत आहोत. दिल्लीमध्ये पुन्हा आपला आवाज हवा आहे. आणि सोलापूरची जनता प्रणिती ताई शिंदे यांच्या रूपात हा आवाज बघत आहे याचा आम्हाला सार्थ विश्वास आहे.
– सुरेश हसापुरे, वरिष्ठ उपाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी.
संचालक, सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ
माजी संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक