सोलापूर : सोलापूर ही वीरशैवांची नगरी समजली जाते. प्राचीन काळापासून वीरशैव समाज सोलापूर शहर जिल्ह्यात विखुरलेला आहे. तो आपला उद्योग आणि व्यवसाय प्रामाणिकपणे करत आलेला आहे. पण अलीकडच्या काळात वीरशैव समाजाची अधोगती होत आहे. तेंव्हा समाजाच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कांचन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदीप चाकोते यांनी केले.
अखिल भारतीय वीरशैव महासभा युवक आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वीरशैव व्हीजनतर्फे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आप्पासाहेब बिराजदार, समाजसेवक अशोक कोनापुरे, उद्योजक मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते आनंद दुलंगे, वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले उपस्थित होते.
यावेळी बुरकुले म्हणाले की सुदीप चाकोते हे अल्पावधीतच सोलापूरच्या सामाजिक क्षेत्रात उत्तुंग असं कार्य करणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या निवडीमुळे वीरशैव समाजाला निश्चितच न्याय मिळेल. ते समाजाच्या प्रगतीला हातभार लावतील. त्याकरिता समाज त्यांच्यासोबत राहणे आवश्यक आहे.
यावेळी उत्सव समिती अध्यक्ष सोमेश्वर याबाजी, सहकोषाध्यक्ष विजय बिराजदार, युवक आघाडी उपाध्यक्ष सोमनाथ चौधरी, योगेश कापसे, मन्मथ कपाळे, मेघराज स्वामी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. सूत्रसंचालन विजयकुमार बिराजदार यांनी तर आभार प्रदर्शन सोमेश्वर याबाजी यांनी केले.