सोलापूर : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणी करुनच प्रवेश करावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी नागरिकांना केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे, सोलापूर जिल्ह्यातून कलबुर्गी तसेच विजयपूर जिल्ह्यात जाण्यासाठी सीमा आहेत, त्यापार्श्वभूमीवर कलबुर्गी जिल्हा प्रशासनाने आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल असल्याशिवाय जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कलबुर्गी जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी. तसेच अगदीच अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करु नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, मास्क नेहमी वापरावा, सैनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही जाधव यांनी केले आहे.