काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतलेले माजी आमदार दिलीप माने हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेपासून काही अंतर लांबच असल्याचं चित्र पाहायला मिळत. जिल्हा दूध संघाचे चेअरमन पद हे राष्ट्रवादीच्या मदतीनेच त्यांना मिळालं त्यानंतर ते वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात दिसून आले,
गुरुवारी दिलीप माने हे आपल्या काही समर्थक कार्यकर्त्यांसह गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते यावेळी त्यांनी जिल्ह्यात बोगस बी बियाणे विक्री होण्यापूर्वी प्रशासनाने काळजी घ्यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानंतर ते बाहेर आले, काही पत्रकार त्यांच्याशी चर्चा करत होते तेव्हा त्यांनी पत्रकारांना हात दाखवत जय महाराष्ट्र म्हंटले त्याचवेळी पत्रकारांनी जय महाराष्ट्र कुणाला? शिवसेनेला की राष्ट्रवादीला? असा प्रश्न विचारताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला, तेव्हा त्यांनी हसत हसतच जय महाराष्ट्र हे आमच्या शिवसेनेचे घोषवाक्य आहे असे सांगून ते निघून गेले,
येत्या 5 महिन्यावर विधान परीषदेची निवडणूक येऊन ठेपली आहे, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस कडे भाजप विरोधात तगडा चेहरा दिसून येत नाही, सध्या प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे हे इच्छूक आहेत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपच्या प्रशांत परिचारक यांना तोडीस तोड उमेदवार द्यायचा आहे,
बुधवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी विधान परिषदेचा विषय झाला, त्यात दिलीप माने यांच्या नावाची चर्चा झाल्याचं जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, आणि दिलीप माने हे सुद्धा त्यासाठी इच्छूक आहेत, ते भाजपला टफ जाऊ शकतात, त्यांची खर्च करण्याची ताकद आहे, असे त्या नेत्याने बोलून दाखवले. विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील असल्याने आणि राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष या तिघांचे महाविकास आघाडीचे सरकार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कडून इच्छुकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सुद्धा पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी येणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरण्याची शक्यता आहे.