आर्थिक देवाणघेवाणीच्या तक्रारीवरून दक्षिण सोलापूर व अक्कलकोटचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना राज्य शासनाने गुरुवारी तडकाफडकी निलंबित केल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. महसूल व वनविभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी निलंबनाचा आदेश काढला असून हा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे.
प्रांताधिकारी शिंदे यांच्याविरोधात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून गंभीर स्वरूपाच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. शिवाय या तक्रारीसोबत आर्थिक देवाणघेवाणीसंदर्भातील ध्वनिफितही दाखल करण्यात आली होती. या ध्वनिफितीतील आर्थिक देवाणघेवाणीचे संभाषण हे गंभीर स्वरूपाचे असल्याने शासनाने शिंदे यांची विभागीय चौकशी करण्याचे
ठरविले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रांताधिकारी शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. प्रांताधिकारी शिंदे यांच्याविरूध्द नागरिकांच्याही मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. प्रांताधिकारी पदाचा कार्यभार असताना त्यांच्याकडे भूसंपादनाचीही अतिरिक्त जवाबदारी होती. तसेच प्रांताधिकारी पदाचा कार्यभार घेण्यापूर्वी ते पूर्णवेळ भूसंपादन अधिकारी म्हणून काम पाहत होते. भूसंपादन कामातही त्यांच्याविषयी अनेक बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. तसेच शासनाचे वाहन असताना ते खासगी वाहन वापरत होते. त्या वाहनावर आरटीओ किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता निळा दिवा ते वापरत होते. या वाहनावर चालकही खासगीच होता. सरकारी सेवेतील चालक नाकारून खासगी चालक ठेवण्याचे कारण गुलदस्त्यात होते. आता त्यांच्या या सर्व कारभाराची चौकशी होणार आहे.