पालकमंत्री भरणेमामा सोलापूरकरांवर काहीसे नाराज होते, नाराजी सुद्धा अपेक्षित होती, कारण सोलापूरकरांनी आपल्या हक्काचे पाणी इंदापुरला देण्यास विरोध केला, त्यामुळे इंदापूरचे आमदार असलेले दत्तामामा अडचणीत आले, स्थानिक रोषाला सामोरे गेले, पण झाले गेले, पालकमंत्री पदाची जबाबदारी नीट सांभाळा अशा सूचना मोठ्या साहेबांनी दिल्या नंतर मामांना गपगुमान सोलापूरला यावे लागले.
शुक्रवारच्या दौऱ्यात त्यांचा नगरसेवक किसन जाधव यांनी सत्कार करण्याचे ठरवले, सत्काराला 30 किलोचा भला मोठा हार आणला, हा हार निरोपाचा की स्वागताचा?असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीतून उपस्थित झाला होता, दरम्यान आतमध्ये प्रेस झाल्यानंतर मामांच्या वाढदिवस निमित्त सत्कार होत असल्याचे स्पष्टीकरण किसन जाधव यांनी दिले, त्याचवेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे आत आले त्यांना मामांनी सन्मानाने बसायला सांगितले सत्कारावेळी जवळ घेतले, म्हेत्रे सोबत बाजूला बसलेले महेश अण्णा पण सत्काराच्या आत आले,
सत्कारानंतर सिद्धाराम म्हेत्रे यांनी बरेच पत्र दत्तामामाना दिली,लगेच त्यांनी मामांच्या कानात बराच वेळ काय तरी सांगितले, बहुतेक हा विषय निधीचा असावा, मामांनी लगेच सर्व पत्रांवर पटापट सह्या केल्या,म्हेत्रे जेव्हा माध्यमांशी बोलत होते तेव्हा दोघात काय गुफ्तगू झाली असे विचारताच त्यांनी हास्य करत ते सांगायचे असते का म्हणून टाळले. मात्र अक्कलकोट भाजपवाल्यां पेक्षा आपल्या महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे लक्ष द्या असे तर सांगितले नसतील ना ?
सध्या अक्कलकोट तालुक्यात विकास कामांच्या निधी वरून बरेच राजकारण सुरू आहे, अक्कलकोट भाजप मध्येच अंतर्गत धुसफूस आहे, त्याचा फायदा काँग्रेस घेताना दिसते. डीपीसीच्या निधी वाटपात झेडपी मध्ये वाद सुरू आहे, सदस्य पालकमंत्र्यांच्या निधी वाटप भूमिकेवर नाराज आहेत.