सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे राजीनामा दिला, तो राजीनामा म्हेत्रे यांच्याकडेच असून त्यांनी अजूनही सभापती देशमुख यांच्याकडे दिलेला नाही. बाजार समितीचे सभापती होऊन विजयकुमार देशमुख यांना दोन वर्षे पूर्ण झाले आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नेते करत आहेत.
याच दरम्यान माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले, बाजार समितीच्या निवडणुकीवेळी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एकदिलाने निवडणूक लढवली ती जिंकली. त्यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी सहा महिन्यासाठी सभापतीपद मागितले होते मात्र त्यांचा कार्यकाल जवळजवळ दोन वर्ष झाला आहे तरीही ठीक आहे मात्र त्यांनी शब्द पाळावा, आम्ही दिलेला शब्द पाळणारे माणसे आहोत. अविश्वास ठराव आणायचा असता तर कधीच आणला असता मात्र विजयकुमार देशमुख ते मोठे नेते आहेत त्यांचं पक्षात नाव आहे, ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांच्या इमेजला धक्का लावायचा नाही. त्यांना कुणाच्या नावाची हरकत असेल तर त्यांनी दुसरे नाव सुचवावे, त्यांना सभापती करू मात्र त्यांनी दिलेला शब्द पाळावा.
उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे, विजयकुमार देशमुख यांच्या राजीनाम्याची आम्ही वाट पाहत आहोत मी, काका साठे, हसापुरे भेटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरून ते राजीनामा देतील असे हावभाव दिसले मात्र नक्की काय झाले हे अजूनही समजत नाही तरीही आम्ही वाट पाहतोय अशा शब्दात म्हेत्रे यांनी प्रतिक्रिया दिली.
उपसभापती आपला राजीनामा सभापतींकडे देतात, सभापती मात्र जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे राजीनामा देतात. आणि जिल्हा उपनिबंधक हे सभा काढून सभापती निवड करतात. अविश्वास ठराव आणायचा असेल तर संचालक संख्येच्या 50 टक्के सदस्यांनी तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देऊन अविश्वास ठरावाची मागणी करायची .जिल्हाधिकारी हे 15 दिवसांनी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावतात त्या सभेत संचालक संख्येच्या दोन-तृतीयांश सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले तर सभापती पद रद्द होते जर दोन- तृतीयांश संचालक सभेला हजर न राहिल्यास पुढील सहा महिने सभापतींवर अविश्वास ठराव आणता येत नाही अशी प्रक्रिया आहे.



















