सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील हे अक्कलकोट तालुक्यात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये काम करत आहेत. ते जरी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांच्यावर अकलूजच्या मोहिते पाटलांचा पगडा आहे,त्यात विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांचे ते जबरा फॅन समजले जातात. हे संबंध त्यांचे वडील स्वर्गीय माजी आमदार महादेव पाटील यांच्यापासून आहेत दरम्यान मल्लू पाटलांनी आपलं मोहिते पाटील प्रेम जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच विषय समिती सभापती निवडीमध्ये त्यांच्या मतदानावरून दिसून आले.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी मल्लिकार्जुन पाटील हे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या केबिनमध्ये बसले होते, त्यावेळी काही पत्रकारांनी त्यांना विविध विषयावर छेडले. एका पत्रकाराने तर आता जिल्हा परिषदेचा नागणसूर की सलगर मतदारसंघ असे विचारले त्यावर मल्लू पाटील यांनी मी आता सिद्धाराम म्हेत्रे साहेबांचा कार्यकर्ता आहे त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात काम करतो त्यांनी सांगितले तर तडवळ मतदारसंघात पण जाऊन निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे.
याच वेळी एका पत्रकाराने आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील हे जेऊर मध्ये मुक्कामाला येणार आहेत असे म्हणताच मल्लू पाटील यांचा चेहरा पाहण्यासारखा होता. दरम्यान आता पत्रकारांना उत्तर काय द्यायचे याचा विचार मल्लू पाटील यांनी केला आणि लगेच मोहिते पाटलांनी अक्कलकोट शहरात मुक्काम केला तर माझा अपमान आणि जेऊर मध्ये मुक्काम केला तर माझा तो सन्मान असेल असे सांगितले मग पत्रकारांनी मोहिते-पाटील कोणतेही असू दे सर्व तुमचेच आहेत असा अर्थ आम्ही काढायचा का? असा प्रश्न केला तेव्हा तसेही समजा असे सांगून मल्लू पाटील यांनी आपलं मोहिते पाटील प्रेम दाखवून दिलं.


















