स्थळ-जिल्हा नियोजन भवन….वेळ -दुपारी बाराची….पालकमंत्री दत्तामामा भरणे यांचा ताफा आला….बाजूला थांबलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश गादेकर यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले, त्यांच्याशी चर्चा केली, शेजारी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान होते, निवेदन देऊन गादेकर निघाले, जाताना त्यांनी जुबेर बागवान यांना खेचले…,म्हणाले अध्यक्ष येऊ का?काही वेळ बागवान यांना समजले नाही ते थोडे भांबरले गादेकर यांच्या जवळ आल्यानंतर प्रोटोकॉल आहे, अध्यक्षांना सांगून जावे लागते म्हणून ते निघून गेले. तिथे थांबलेल्या पत्रकारांना काही वेळ समजले नाही. जेव्हा जुबेर बागवान यांनी बोलण्यास सुरुवात केली तेव्हा सत्य समोर आले.
काही दिवसांपासून मला ज्येष्ठ नेते अध्यक्ष म्हणून खेचा खेची करत आहेत पण मी युवक मध्येच ठीक आहे. ज्या नेत्याने मागील 4 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोलापूर शहरात मोठे केले, वाढवले, सर्वधर्मसमभाव ठेवून पदे दिली तो नेता शहराध्यक्ष पदाच्या लायकीचा व दावेदार आहे त्यांचा हक्क आहे असे सांगून त्यांनी नकळत शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्याकडे इशारा केला.
नेमके जुबेर बागवान यांना अध्यक्ष म्हणून खेचाखेची का होत आहे याची खोलात जाऊन माहिती घेतली असता राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून सोलापूरच शहराध्यक्षपद बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली मात्र पद द्यायचं कुणाला पक्षासमोर विषय असून एका बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महेश कोठे, विद्या लोलगे, जुबेर बागवान असे काही जण होते त्यावेळी जयंत पाटलांनी महेश कोठे यांना अध्यक्षपद घ्यावे अशी इच्छा व्यक्त केली मात्र कोठे यांनी तांत्रिक दृष्ट्या मला तीन-चार महिने अध्यक्षपद घेता येत नाही दुसऱ्या कोणाला तरी द्यावे विद्या लोलगे यांना चार महिने हंगामी अध्यक्षपद द्यावे अशी मागणी पुढे आली, मात्र नेत्यांच्या गटबाजी मुळे विद्या लोलगे या इच्छुक नसून त्यांनी नंतर बघू म्हणून पक्षाला सांगितले आहे.
दरम्यान यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने जुबेर बागवान यांनीच महेश कोठे यांच्याकडे चार महिने हंगामी अध्यक्षपद द्यावे अशी मागणी केल्याची चर्चा सुरू केली असून त्यामुळेच जुबेर यांची खेचाखेची सुरू असल्याचं समोर आलं. दरम्यान अध्यक्ष पद संतोष पवार यांच्याकडे जाऊ नये म्हणून काही नेत्यांनी आता अध्यक्षपद मराठा समाजाला नको, पर्याय मिळत नसेल तर भारत जाधव हेच ठीक आहेत अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.


















