सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूर शहरांमध्ये महापालिकेच्या अख्त्यारीत येणारे अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजवा अभियान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर शहराच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे यांनी या अभियानातून पुढाकार घेतला असून शहरात या अभियानाचे उद्घाटन शनिवारी दुपारी नवीन आरटीओ कार्यालय परिसरातील मुख्य रस्त्यावर झाले. उद्घाटन प्रसंगी महापौर महेश कोठे, शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, महिला अध्यक्ष तथा नगरसेविका सुनीता रोटे, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सुहास कदम, माजी नगरसेविका सुनंदा साळुंखे, युवकचे प्रशांत बाबर, प्रांतिक सदस्य महेश निकम्बे,महिला आघाडीच्या मनीषा नलावडे, उपाध्यक्ष राम साठे, सेवादल अध्यक्ष चंद्रकांत पवार, विजय बाहेती, कय्युम शेख, बंडू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महेश कोठे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने साडेचार वर्ष सोलापूर महापालिकेत एक हाती सत्ता भोगली मात्र शहराचा विकास किती झाला त्यांनी दाखवून द्यावे,त्यांचे नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर झाल्याने भ्रष्टाचार वाढला आहे. शहरात पाहिलं तर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत दोन देशमुख मंत्री असतानाही शहराची अवस्था विकासाऐवजी भकास झाली अशा या नाकर्ते भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या महापालिका निवडणुकीत घरी बसवा त्यासाठी वेळप्रसंगी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणुका लढवू.
शहराध्यक्ष जाधव म्हणाले, शहरात मूलभूत सुविधा होत नाहीत, रस्त्यावरील खड्ड्यामुळे बरेच अपघात झाले आहेत, नागरिक त्रस्त आहेत, म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने खड्डे बुजवायचं काम हाती घेतले आहे. मोठे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेला भाग पाडू.
विद्या लोलगे म्हणाल्या, शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे,खड्ड्यामध्ये पडल्याने अपघात वाढले, दुर्घटना वाढल्या, मणक्याचे आजार वाढले आहेत, मात्र महापालिका या समस्येकडे दुर्लक्ष करते आहे, त्याचा विचार करून आम्ही खड्डे बुजवा अभियान हाती घेतले आहे, प्रत्येक प्रभागात हे अभियान राबवणार असून नागरिकांनी आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन लोलगे यांनी केले.
सुनीता रोटे म्हणाल्या, महापालिकेत भाजपची सत्ता आहे, मात्र शहराची अवस्था पहिली तर बिकट आहे, सोलापूर नव्हे खड्डेपूर अशी चर्चा असून त्याला महापालिकेतील भाजप सत्ताधारी कारणीभूत आहेत.




















