सोलापूर जिल्ह्यात महसूल सप्ताह साजरा केला जातो आहे. प्रशासन दारोदारी जाऊन नागरिकांना सेवा पुरवीत आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अक्कलकोट तालुक्याचा दौरा केला. यावेळी सोबत उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार शिरसट हे सोबत होते.
अक्कलकोट तालुक्यातील काळेगाव येथे महसूल सप्ताह अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते गावातील लाभार्थ्यांना शिधापत्रिका, विविध प्रकारचे दाखले, मोफत सातबारा तसेच पंचायत समिती विभागाकडील ग्रामपंचायत निधीतून दिव्यांगासाठी पाच टक्के निधीचे चेक लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची संवेदनशीलता दिसून आली, यावेळी दिव्यांग लाभार्थी होते, ते पाहून खुर्ची सोडली लाभार्थी बसलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना दाखले दिले.
प्राथमिक शाळेच्या आवारात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी त्यांनी बाळगोपाळांशी संवाद साधत हास्यविनोद करत खाऊचे वाटप केले. त्याचबरोबर खरीप हंगामाच्या ऑनलाईन ई पीक पाहणीचे तलाठ्यांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून पाहिले.