सोलापूर – शासकीय निमशासकीय कार्यालयातील रिक्त पदे बाहय यंत्रणेव्दारा कंत्राटी पध्दतीने 138 संवर्गात अतिकुशल/ कुशल/अर्धकुशल/ अकुशल अशा सर्व प्रकारचे मनुष्यबळ पॅनलमधील 9 एजन्सी मार्फत पुरविण्याचा शासनाने दि. 06 सप्टेंबर 2023 रोजी निर्णय जारी केला आहे.
या शासन निर्णयामुळे राज्यातील बेरोजगारांचे कायम नोकरीचा हक्क हिरावून घेतला जाणार असून आर्थिक गुलामगिरीला सामोरे जावे लागणार असल्याने आज दुपारी 1.30 वाजता जिल्हा परिषद पूनम गेट येथे कामगार विरोधी निर्णयाची होळी करुन शासनाकडे खालील मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र निदर्शने करण्यात आली.
या शासन निर्णयानुसार सेवा पुरवठादार एजन्सीला 15 टक्के सेवाशुल्क देय राहील, 1 टक्का उपकर असंघटीत कामगार मंडळाची वर्गणी व 1 टक्का संकीर्ण खर्चापोटी कंत्राटी कामगारांकडून वसूल होईल. संदर्भिय शासन निर्णयासेाबत जाहीर केलेल्या एकत्रित वेतनातून वरील 17 टक्के रक्कम व प्रॉव्हिडंट फंड 13 टक्के व राज्य कामगार विमा योजनेची वर्गणी 0.75 टक्के रक्कम वसूल केल्या वर प्रत्यक्षात कामगाराच्या हाती येणारी रक्कम ही शासनाच्या किमान वेतनापेक्षाही कमी असणार आहे. अशी माहिती अशोक इंदापूरी दिली.
राज्यात दोन लाखापेक्षाही जास्त पदे रिक्त आहेत. या जागांवर नियुक्ती साठी राज्यातील लाखो तरुण कायम नोकरी मिळेल या अपेक्षेने स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. अशा बेरोजगार उमेदवारांच्या स्वप्नांची राखरांगोळी होणार आहे. त्यामुळे तरुणांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे अशी माहिती राजेश देशपांडे यांनी दिली.
कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ पुरविण्याचे जनविरोधी व कामगार विरोधी शासन निर्णय त्वरीत रद्द करावा. 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय निमशासकीय सेवेत रुजू झालेल्या अधिकारी कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना पूर्ववत लागू करावी.
शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीचे वतीने अशोक इंदापुरे, शंतनू गायकवाड, विवेक लिंगराज, दिनेश बनसोडे, राजीव साळुंखे, नितीन कसबे मा-याप्पा फंदीलोलू, देविदास शिंदे,उमाकांत कोठारे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे वरील मागण्यांचे निवेदन दिले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राजेश देशपांडे, अविनाश गोडसे,अशोक जानराव, सायमन गट्टू, पंकज जाधव,देविदास शिंदे, बाली मंडेपू, विश्वास सुतार, वाहिद शेख, नरेश बोनाकृती, सोनाली बेत, चंद्रकांत चलवादी, नूर कादरी, रवि नष्टे, गजानन गायकवाड, खंडू भोसले, विठ्ठल कोकाटे, विजय ढावरे, तुकाराम गायकवाड, शेषराव शिरसाट, आनंद सोनकांबळे या आंदोलनावेळी कर्मचारी उपस्थित होते.