सोलापूर : सुमारे दोन वर्षांपासून महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तो प्रवेश थांबवला होता. त्यानंतर कोठे यांनी काँग्रेस फोडण्यास सुरुवात केली. ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी महापौर यु एन बेरीया यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आणले.
अनेक महापालिकेला इच्छुक असलेले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आले. कोठेंनी भाजप सुद्धा फोडली. एमआयएमला पण सुरुंग लावला. त्यामुळे राष्ट्रवादीने सोलापूर महापालिकेत सत्तेचे स्वप्न पाहिले आहे. शरद पवारांनी सर्व अधिकार महेश अण्णाना दिले. त्यामुळे धुसफूस झाली, वाद झाला, अजितदादा व मोठ्या साहेबानी सर्वाना तंबी दिली.
आता सर्व चांगले चालू होते. परंतु सरकार पडले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पंढरपूर दौऱ्यात कोठे यांनी आपल्या समर्थकांसोबत सीएम शिंदे यांची भेट घेतली. काहींनी शिंदे गटात प्रवेश केला. कोठे ही शिंदे गटात जाणार अशा बातम्या आल्या. नंतर त्यांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली. या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चलबिचल सुरू झाली, नव्याने राष्ट्रवादीत आलेल्यांची अडचण झाली.
कोठे यांना वरिष्ठांनी बोलावून घेत भेटीवर चर्चा केली. याच दरम्यान शहर निरीक्षक शेखर माने यांना सोलापूरला पाठवून तातडीने सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक लावली या बैठकीत कोठे यांच्या बाबत स्पष्टीकरण देण्यात आले स्वतः महेश कोठे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबणार असल्याचे सांगून नेत्यांना धीर दिला.
दरम्यान कोठे यांच्यावर भरोसा ठेवून राष्ट्रवादीत गेलेले सुधीर खरटमल यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले, शुक्रवारी मी आणि महेश कोठे चार तास सोबत होतो. कोठे यांचे एक अतिशय महत्त्वाचे काम अजित पवार यांनी केले आहे. त्यामुळे कोठे हे राष्ट्रवादीतच राहणार असा मला ठाम विश्वास आहे. कोठे यांची राजकीय महत्वाकांक्षा जी आहे ती पूर्ण होत असेल त्या कारणास्तव त्यांनी राष्ट्रवादी सोडली तरी सुद्धा मी राष्ट्रवादी सोडणार नाही कारण शरद पवार यांनी आपणावर विश्वास दाखवला आहे महापालिकेमध्ये कशा पद्धतीने राष्ट्रवादीची सत्ता आणायची यावर सध्या आमचं लक्ष केंद्रित आहे. अशी भूमिका सुधीर खरटमल यांनी मांडली.