सोलापूर : राज्यातील तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार बदलले आणि शिवसेना बंडखोर व भाजपच्या युतीचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार याचीच सर्वाधिक चर्चा ऐकण्यास मिळते. कधी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव येते तर कधी रणजितसिंह मोहिते पाटील किंवा आमदार राम सातपुते यांचे.
सांगोल्याच्या शहाजी बापूंचे ही नाव चर्चेत आहे. शेवटी सोलापूरचे शांत सर्वाना सोबत घेऊन जाणारे ज्येष्ठ आमदार विजय देशमुख यांच्यावर गाडी येऊन थांबते. आगामी महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक तसेच विधान परिषद निवडणूक लक्षात घेता विजयकुमार देशमुख हेच पालकमंत्री पदासाठी योग्य चेहरा असल्याचे अनेकांकडून बोलले जाते माध्यमांतून सुद्धा त्यांचेच नाव आघाडीवर आहे.
मध्यंतरी विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याही पालकमंत्री पदाच्या बातम्या अनेकांनी छापल्या परंतु त्यांना राज्यमंत्री कदाचित लॉटरी लागेल अशी आता चर्चा सुरू झाली आहे तर माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांना तर सामाजिक न्याय राज्यमंत्री जवळजवळ निश्चित झाल्याची चर्चा केली जात आहे.
मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून आता बार्शीचे फडणवीस निष्ठ आमदार राजेंद्र राऊत यांचे नाव निश्चित झाल्याचं बोललं जातं आहे. 2019 मध्ये अपक्ष निवडून आल्यापासून आमदार राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले आहेत. त्याचेच बक्षीस त्यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख व विजय देशमुख यांच्या मंत्रीपदाबाबत अद्यापही काही निर्णय झाला नसल्याचे बोलले जाते. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर देशमुख आमदारांना मंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. अशी माहिती अथवा चर्चा असतानाही विजय देशमुख हेच पालकमंत्री म्हणून सर्वांची पसंती असल्याचे पहायला मिळते.