अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत
सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला धक्का बसला असून भाजपचे जुने कार्यकर्ते जिल्हा परिषदेचे माजी पक्षनेते आनंद तानवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
वागदरी या जिल्हा परिषद गटातून त्यांनी आपले बंधू प्रवीण दत्तात्रय तानवडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली आहे. आनंद तानवडे यांनी मात्र आपल्या तीन अपत्याचा न्यायालयातील मुद्दा असल्याने यंदा जिल्हा परिषदेच्या रिंगणातून माघार घेत आपल्या बंधूंना त्यांनी रिंगणात उतरवले आहे.
शेवटच्या दिवशी वागदरी जिल्हा परिषद गटातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु ऐनवेळी भाजपच्या वतीने राजश्री बसवराज शेळके यांना भाजपचा एबी फॉर्म दिल्याचे सांगण्यात आले आणि सागर कल्याणशेट्टी यांनी चपळगाव पंचायत समिती गणनातून उमेदवारी अर्ज भरला आहे.
आनंद तानवडे हे यापूर्वी दोन वेळा जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. एकदा विरोधी पक्ष नेता आणि एकदा पक्षनेते पदावर त्यांनी जिल्हा परिषद मध्ये कामकाज केले आहे. भाजपकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आपल्या बंधूंसाठी उमेदवारी घेत आमदार कल्याणशेट्टी यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.


















