


प्रभाग २२ मध्ये भाजप उमेदवारांच्या पदयात्रेत महिलांसह मुस्लिम बांधवांचा सहभाग ; सामाजिक एकतेचा संदेश
सोलापूर – सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, सौ. अंबिका नागेश गायकवाड व सौ. चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे. याच अनुषंगाने बुधवारी रामवाडी परिसरातील गैबीपीर नगर व लगतच्या भागात पदयात्रा व मतदार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत महिलांसह मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली, ज्यामुळे सामाजिक एकतेचा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला.
माजी नगरसेवक नागेश गायकवाड तसेच लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा पार पडली. प्रशासन राजवटीच्या काळात नागरिकांना भेडसावलेल्या विविध अडचणी, मूलभूत सुविधांतील त्रुटी तसेच त्या सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आढावा यावेळी मतदारांशी संवाद साधत मांडण्यात आला. आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून तसेच महायुती सरकारच्या सहकार्यातून प्रभाग २२ साठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी कामांना गती मिळाल्याचेही सांगण्यात आले.
पुढील काळात आरोग्य सुविधा बळकट करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान, बालगोपालांसाठी चिल्ड्रन पार्क तसेच स्वच्छता विषयक भरीव कामे करण्याचा मानस किसन जाधव यांनी व्यक्त केला. लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महिलांना भविष्यात अधिक लाभ मिळावा, यासाठी शासन दरबारी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा प्रभाग २२ चे नेतृत्व करण्याची संधी द्यावी व मतदानाच्या रूपाने आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही यावेळी किसन जाधव यांनी मतदारांना केले. या पदयात्रेमुळे विकास, सामाजिक सलोखा आणि विश्वासाचे वातावरण अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.




















