अण्णांच्या दौऱ्याने राष्ट्रवादीचा ‘कॉन्फिडन्स’ वाढला ; सोलापुरात ‘अब की बार 75 पार’च्या नाऱ्याने भाजपला हिणवले









सोलापूर : आगामी महापालिका निवडणूक कधी लागेल याकडे सर्वच कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. आरक्षणाचा गोंधळ सुरू असल्याने निवडणूक लांबणीवर जाते का ही भीती पण उपस्थित होत आहे. पण राज्यात सत्तेत असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिसत आहेत.
सोलापुरात तिन्ही आमदार भाजपचे असल्याने त्यांची तयारी जोरदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आता स्वबळाची तयारी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरची जबाबदारी ही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कडे सोपविली आहे.
मामांचा दौरा झाला आता सोलापूरचे सह संपर्क मंत्री अण्णांनी मनावर घेतले आहे. विशेष म्हणजे भरणे मामा आणि अण्णा बनसोडे हे दोघेही जनसामान्य लोकात मिसळणारे नेते आहेत. त्यांच्या वागण्यात बोलण्यात अकडूपणा दिसत नाही. अण्णा हे तर सोलापूरला सलग तीन दिवस निवडणुकीच्या तयारीसाठी आहेत.
गुरुवारी त्यांचा दौरा सुरू झाला. अनेक कार्यक्रम, गाठीभेटी तसेच पक्षप्रवेश होत आहेत. अण्णांच्या या दौऱ्याने राष्ट्रवादीचा कॉन्फिडन्स इतका वाढला की त्यांनी अब की बार 75 पार असा नारा दिला आहे. मित्रपक्ष भाजपला हे एकप्रकारे आव्हान असून सोलापुरात दादांच्या राष्ट्रवादीला प्रतिसाद मिळताना दिसून येतोय.
शहराचे अध्यक्ष संतोष पवार, महापालिकेतील गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते किसन जाधव, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी नगरसेवक तौफिक शेख, नुकतेच राष्ट्रवादीत आलेले सुधीर खरटमल यांच्यामुळे पक्षाला बळकटी मिळाली असल्याचे दिसून येते.

















