सोलापुरात आय टी पार्कचा मार्ग मोकळा ; दीड वर्षात होणार पार्क ; जिल्हाधिकाऱ्यांनी ही दिली माहिती
सोलापूर : नियोजित आयटी पार्क ही होटगी येथील जलसंपदा जागेवरच होणार असून, त्यासाठी सूमारे 40 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव राज्यशासनाच्या उच्चचस्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे, प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतर दिल्यानंतर 18 महिन्यांत बांधकाम पूर्ण होऊन आयटी पार्क सुरु होतील अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
गेल्या काहीं वर्षांपासून सोलापुरात आयटी पार्क सुरु करण्याची वारंवारं मागणी होत होती. मागील तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटी पार्कसाठी जागेचा शोध घेऊन प्रस्ताव पाठविण्याचा आदेश जिल्हाप्रशासनाला दिले होते. त्यानूसार हिरज, कुंभारी, जुनी मिल, होटगी येथील जागेची पाहणी करण्यात आली. यात होटगी येथील जागा निश्चित करण्यात आली आहे.
होटगी येथे जलसंपदा विभागाच्या मालकीची 50 एकर जागा ही लॉजिस्टिक पार्कसाठी देण्यात आली असून, आता तीच जागा आयटी पार्कसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. जागेसाठी सूमारे साडेतीन कोटी रुपये जलसंपदा विभागाला एमआयडीसी विभागाकडून दिले जाणार आहे. अतंर्गत रस्ते, दिवाबत्ती, पाणी आदी मुलभूत सुविधांसाठी सूमारे 37 ते 38 कोटी रुपये लागणार आहे.
सिध्देश्वरची झेडएलडीमुळे शुन्य वास
होटगी रोडवरील सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची सध्या 20 केपीएलडी क्षमतेची डिस्टीलरी प्रकल्प असून, त्यांचा हा प्रकल्प येत्या वर्षभरात 100 केपीएलडी क्षमतेची होणार आहे. यात झीरो लिक्वीड डिस्चार्ज (झेएलडी) तंत्राचा वापर केल्याने मळीचा वास हा शुन्यावर येणार आहे. याबाबत कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी याबाबतची माहिती भेटून सादर केली असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
इमारत बांधकामाला नाही अडथळा
होटगी रोडवरील विमानतळावरुन उडणाऱ्या विमानसेवेच्या फनेलमध्ये प्रस्तावित आयटी पार्क इमारतीचा समावेश होत नाही. 50 मीटर उंचीपर्यंत बांधकाम करता येते. याबाबत होटगी रोडवरील विमानतळ प्रशासनाचा अभिप्राय घेण्यात आला आहे. तसेच होटगी येथील प्रस्तावित आयटी पार्क जागेच्या 50 एकरावर सूमारे 40 ते 45 हजार जण बसून काम करतील इतकी क्षमता असल्याचेही आशीर्वाद यांनी सांगितले. तसेच पुण्याच्या हिंजवडीपेक्षा स्वस्तात होटगी येथे जागा उपलब्ध होणार आहेत.

















