काय राव ! आपणाला पुन्हा पाच वर्ष मिस्टर मेंबर म्हणूनच रहावे लागणार
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण झाल्याचे सर्व प्रभागात आणि राजकीय लगबग वाढली आहे. अनेक जन सेफ झाले, काहींचे प्रभाग महिलेसाठी आरक्षित झाल्याने अडचण सुद्धा झाली आहे. अनेक नेत्यांना तर परत पाच वर्षे मिस्टर नगरसेवक म्हणूनच मिरवावे लागणार असे चित्र आहे.
या मिस्टर नगरसेवकांमध्ये जॉन फुलारे, अंबादास बाबा करगुळे, अजित गायकवाड यांचा समावेश आहे. हे तीन ही नेते निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पण त्याचे प्रभाग महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांना आता पर्याय नाही.
जॉन फुलारे यांच्या पत्नी श्रीदेवी फुलारे या मागील दोन टर्म काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. याठिकाणी जॉन फुलारे यांचे वलय असून ते दरवेळी निवडणुकीसाठी उत्सुक असतात, पण आरक्षण नसल्याने त्यांची अडचण होते. यंदा ते प्रभाग सोळा मधून इच्छुक असल्याचे समजते पण पत्नी उमेदवार असल्याने त्यांना इकडे लक्ष द्यावे लागणार आहे त्यामुळे ते काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष सद्या भाजपमध्ये असणारे बाबा करगुळे यांच्या पत्नी सुद्धा नगरसेविका होत्या. यापूर्वी अनेक वर्ष त्यांच्या आई नगरसेविका राहिल्या आहेत. यावेळी मात्र बाबा नगरसेवक व्हावा अशी युवा कार्यकर्त्यांची प्रचंड इच्छा होती कारण परिस्थिती सुद्धा चांगली आहे. शहर मध्य आमदार देवेंद्र कोठे यांचा प्रभाव आहे. मोची समाज बऱ्यापैकी काँग्रेस कडून भाजपकडे वळाला आहे. पण या प्रभागात अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षण पडल्याने बाबाची अडचण झाली आहे. पत्नीला उभे केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही त्यांची लढत ही श्रीदेवी फुलारे यांच्या विरोधात होणार आहे.
बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार विजयकुमार देशमुख समर्थक अजित गायकवाड हे सुद्धा यावेळी निवडणुकीसाठी इच्छुक होते. मागील पाच वर्ष त्यांच्या पत्नी वंदना गायकवाड या नगरसेविका होत्या. त्यांचा या भागात चांगला प्रभाव आहे. पाच वंदना गायकवाड यांनी अनेक विकास कामे केल्याने त्या चर्चेत राहिल्या आहेत. आरक्षण एस सी महिलेसाठी झाल्याने अजित भाऊंना पत्नीला उभे केल्याशिवाय पर्याय नाही. महापालिकेच्या सभागृहात जाण्यासाठी भाऊला परत पाच वर्षे वेटींग करावे लागणार आहे.



















