काका साठेंच्या काळजात शरद पवार नाहीतच! पवार साहेबांशी थेट संबंध तोडल्याची केली भाषा
सोलापूर : सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी रविवारी तडका फडकी निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संबंध तोडल्याची भाषा केली. या निर्णयामुळे सोलापुरातील राजकारणात सध्या चर्चेला उधाण आले आहे.
विशेष म्हणजे काका साठे यांच्या वडाळा गावी झालेल्या बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांची उपस्थिती होती.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष बदलून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत नाना देशमुख यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली. तेव्हापासून काका साठे पक्षावर नाराज आहेत. दरम्यान शरद पवार यांनी बोलावून त्यांची नाराजी सुद्धा घालवली होती आणि भविष्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन अध्यक्ष केले जातील असे त्यावेळी सांगण्यात आले परंतु बरेच दिवस झाले साहेब निर्णय घेत नाहीत, त्यातच आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आहेत यासाठी आपल्या नेत्यांने निर्णय घ्यावा म्हणून कार्यकर्त्यांनी काका त्यांच्यावर दबाव टाकला होता.
शेवटी रविवारी वडाळा येथे बैठक घेऊन काका साठे यांनी शरद पवारांशी संबंध तोडण्याची भाषा केली. कोणत्याही पक्षात जाणार नाही पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या आघाडी करून लढवू असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी मोहिते पाटील गटावर सुद्धा टीका केल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान आता शरद पवार यांच्याशी कोणताही संबंध नाही अशी भाषा केलेल्या काका साठे त्यांच्या या निर्णयावर खुद्द पवार हे काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणी तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच काका साठे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याचे समजते पण उघडपणे तसेही साठे यांनी बोलून दाखवले नाही. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ते कोणासोबत आघाडी करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.