सोलापूरच्या श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयाला क वरून अ दर्जा प्राप्त ; साहेब तुम्ही दिलेला शब्द पाळला
सोलापूर : सोलापूरसह परिसरातील जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात नामवंत असलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा क वरून अ दर्जा प्राप्त झाला आहे, अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली.
श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला यापूर्वी क दर्जा होता.
परिणामी, या रुग्णालयात अनेक महत्त्वाच्या आजारांवर महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार करणे अशक्य होत होते. याबाबत श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात अधिक आजारांवर शासकीय योजनेतून उपचार मिळावेत, अशी मागणी हॉस्पिटल संचालक मंडळ व नागरिकांनी देवेंद्र कोठे यांच्याकडे केली होती. यानंतर कोठे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील सागर बंगल्यावर झालेले बैठकीत मागणी केली होती.यावेळी तत्कालीन फडणवीस यांनी याबाबत कोठे यांना मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते.
विधानसभा निवडणुकीनंतर आमदार कोठे यांनी सत्यनारायण बोल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, श्रीधर बोल्ली, विनायक कोंड्याल, मल्लिकार्जुन सरगम, गुरुशांत धुत्तरगावकर आदींना सोबत घेऊन वरळीतील जीवनदायी भवन येथे आयुष्यमान भारत-मिशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा केला. परिणामी, महाराष्ट्र शासनाने श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचा दर्जा क वरून अ केला आहे.
दर्जातील या सुधारणेमुळे हजारो गोरगरीब रुग्णांना महाराष्ट्र शासनाच्या योजनेतून शेकडो आजारांवर उपचार मिळू शकणार आहेत. विशेष म्हणजे श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात सोलापूर शहर जिल्ह्यासह परिसरातील कलबुर्गी, विजयपूर, सांगली, कोल्हापूर, बिदर, लातूर, धाराशिव, रायचूर अशा अनेक जिल्ह्यांमधून रुग्ण उपचारासाठी येतात. अशा सर्व रुग्णांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाचा मोठा आर्थिक लाभ होणार आहे.
————
शब्द पाळणारे मुख्यमंत्री हे पुन्हा सिद्ध झाले !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एखादा शब्द दिला की ते पूर्ण करतातच अशी त्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे. सोलापूरकरांच्या मागण्या मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचा दर्जा क वरून अ केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्रिवार आभार. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे शब्द पाळणारे मुख्यमंत्री आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सोलापूरचे सुपुत्र असलेले डॉ. ओमप्रकाश शेटे यांचेही याकामी विशेष सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचेही समस्त सोलापूरकरांतर्फे विशेष आभार.
— देवेंद्र कोठे आमदार शहर मध्य