सोलापूर झेडपी सीईओ, डेप्युटी सीईओ यांच्यासाठी कल्याणशेट्टीच ‘दादा’
राज्याच्या ग्रामविकास विभागाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान योजनेअंतर्गत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ग्रामसभा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाचा शुभारंभ अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून ग्रामस्थांच्या सहभागाचे विशेष कौतुक केले व यावेळी लोकसहभातून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. अक्कलकोट मध्ये घेतलेल्या मुख्य कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ त्यांचे प्रमुख उपस्थिती होती.
अशा उपक्रमांची प्रचंड आवड असलेले दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी आपल्या मतदारसंघात बरेच ठिकाणी ग्रामसभांना उपस्थिती लावली. दक्षिण तालुक्यातील हत्तूर, मंद्रूप, हत्तरसंग कुडल, विंचूर या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
पंढरपूर तालुक्यातील तुंगत ग्रामपंचायत येथे आमदार अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी करमाळा तालुक्यातील सालसे व केम गावाला भेटी दिल्या , तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगोला तालुक्यातील चिणके गावाला भेटी दिल्या व अभियाना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा परिषद कडील सर्व विभागप्रमुखांना वेगवेगळे तालुके आणि गाव वाटून देण्यात आले होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकचळवळ तयार होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या निमित्ताने गावे स्वच्छ हरित व समृद्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे. तसेच राज्यातील सर्व गावे मॉडेल गावे करायची आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.