सोलापुरात जीएसटी नंबर साठी पाच हजाराची लाच घेतली ; दोन अधिकाऱ्यांना बेड्या
सोलापूर : ठेकेदाराला जीएसटी नंबर देण्यासाठी पाच हजाराची लाच मागून ती स्वीकारताना जीएसटी कार्यालयातील दोघा कर निरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
महेश जरीचंद चौधरी (वय: 41, राहणार प्लॉट नंबर 18, हरिश्चंद्र नगर, धाराशिव) व आमसिद्ध इराण्णा बगले (वय: 50, राहणार प्लॉट नंबर 17, रेणुकानगरी, जुळे सोलापूर) अशी त्या दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. यातील तक्रारदार यांनी आपल्या कन्स्ट्रक्शन फॉर्मला जीएसटी नंबर मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता.
जीएसटी नंबर देण्यासाठी सोलापूर वस्तू व सेवा कर कार्यालयातील राज्यकर अधिकारी बगले याने 5000 ची लाच मागितली. 21 ऑगस्ट रोजी ठरल्याप्रमाणे ही लाज स्वीकारून त्याने चौधरी यांच्या टेबलावरील फाईल खाली ठेवली. फाईल खाली ठेवलेली लाच स्वीकारताना दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. या दोघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.