इम्तियाज जलील यांना खुश करण्यासाठी शौकत पठाण यांचा नवा फंडा
सोलापूर : काँग्रेस पक्ष सोडून विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान शौकत पठाण यांनी एम आय एम पक्षामध्ये प्रवेश केला. एका कार्यक्रमांमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पठाण यांच्या नावाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून उल्लेख केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या नावापुढे एमआयएम जिल्हाध्यक्ष हे पद लावून घेतले आहे मुळात त्यांना अधिकृत जिल्हाध्यक्ष पद मिळालेले नाही.
पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र मागूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी काही दिवस अलिप्त राहण्याचा निर्णय पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवला होता. परंतु आता ते पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
इम्तियाज जलील यांचा दहा ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त शौकत पठाण यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यांची पठाण यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. जलील यांच्या वाढदिवसानिमित्त पठाण हे इम्तियाज या नावाच्या सोलापुरातील प्रत्येक व्यक्तीला पाच लिटर पेट्रोल मोफत देणार आहेत. हे पेट्रोल सात रस्ता परिसरातील इम्तियाज पेट्रोल पंपावर मिळणार आहे. शौकत भाईने असाच फंडा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात वापरला होता. त्याचे कौतुक झाले पण बऱ्याच प्रमाणात टीका पण झाल्याचे पाहायला मिळाले.
यासह हीजामा शिबिर असे अनेक कार्यक्रम इम्पेरियल गार्डन या ठिकाणी राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त आजपर्यंत सोलापुरात असा पहिलाच कार्यक्रम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. इतर कोणीही असे कार्यक्रम घेतले नाहीत परंतु या कार्यक्रमा मागे शौकत पठाण यांचा स्वार्थ दडला आहे का? अशीही चर्चा सोलापुरातून ऐकण्यास मिळत आहे.