साहेबच माझ्या पाठीशी असावेत ;काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी खुर्चीची दिशा बदलली
सोलापूर : काँग्रेस पक्षाने सुमारे सव्वा वर्षानंतर जिल्हाध्यक्ष पदाची नेमणूक केली आहे. जिल्हाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर अखेर सातलिंग षटगार यांना बसण्याची संधी मिळाली. षटकार जिल्हाध्यक्ष झाल्याने काँग्रेस भवनात सध्यातरी गर्दी असल्यामुळे उत्साह पाहायला मिळत असून काँग्रेस भवनातील जिल्हा अध्यक्ष कार्यालय कार्यकर्त्यांनी भरभरून दिसत आहे.
यापूर्वी जिल्हाध्यक्ष राहिलेले डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस भवन मधील जिल्हाध्यक्ष कार्यालयातील बसण्याची आपली दिशा बदलली होती. त्यांनी पूर्वेकडे खुर्ची करून बैठक व्यवस्था केली होती. पण नवे जिल्हाध्यक्ष सातलिंग षटगार यांनी पुन्हा बसण्याची दिशा बदलून यापूर्वीचे सर्व जिल्हाध्यक्ष ज्या पद्धतीने बसायचे त्याच पद्धतीने त्यांनी रचना केल्याचे पाहायला मिळाले. आपल्या खुर्चीच्या पाठीमागे सुशीलकुमार शिंदे यांचा फोटो त्यांनी आहे तसा ठेवला आहे.
शटगार यांच्या रूपाने जिल्हा काँग्रेसला वजनदार अध्यक्ष मिळाला आहे, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ते ग्रामीण भागात कितपत प्रभावी ठरणार हा येणारा काळ ठरवेल.