सोलापुरात एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का ; तब्बल 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाला सोलापुरात मोठा धक्का बसला असून नाराज झालेल्या तब्बल ११ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे पाठवले आहेत. यात प्रामुख्याने माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, हरिभाऊ चौगुले यांनी पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले.
दोन दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी नाराज होऊन आपला राजीनामा दिला होता. त्यामध्ये आपणाला विश्वासात न घेता सोलापूर जिल्ह्यात परस्पर पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि प्रवेश होत आहेत अशी नाराजी व्यक्त केली होती.
त्याच दृष्टीने सावंत गटाचे मानले जाणारे दिलीप कोल्हे, हरिभाऊ चौगुले यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपले राजीनामे दिल्याचे जाहीर केले. लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या कार्यपद्धतीवर सर्वांनीच नाराजी व्यक्त केली.
महेश साठे हे कोणालाही विश्वासात घेत नसल्याचे सांगण्यात आले. महेश साठे यांच्यामुळे पक्षाची वाताहात होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना पदे वाटण्याचा कोणताही अधिकार नसताना त्यांची लुडबुड का? मी सोलापूरचा समन्वयक असताना मला काहीही विचारले जात नाही अशी नाराजी कोल्हे यांनी व्यक्त केली.