अजय सोनटक्के यांची परीट समाजाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड
श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने यांचे कट्टर समर्थक अजय सोनटक्के यांची परीट समाजाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
सोनटक्के यांची समाजकार्य, आश्वासक, हरहुन्नरी, लोकभावनेचा आदर करणारे, मनमोकळ्या स्वभावामुळे सर्वांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करणारे, अशी त्यांची खरी ओळख आहे.
परीट समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी आपली 25/6/2016 पासून कामाला सुरुवात केली. उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष पदावर काम करताना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून, तरुणांना संघटित करून आणि सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी आपले नेतृत्व वेगळे ठरवले. या कार्याची दखल घेत त्यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी केवळ संघटनाला बळकटी दिली नाही तर समाजातील अनेकांना प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या दूरदृष्टीच्या विचारसरणी, कार्यतत्परतेमुळे त्यांना महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळाने त्यांना आणखी मोठी जबाबदारी सोपवली आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी त्यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली.
नुकतेच पंढरपूर येथील आनंदी मंगल कार्यालयात महाराष्ट्र (धोबी) सेवा मंडळाचे प्रदेश अध्यक्ष खंडेराव कडलक, लॉन्ड्री प्रदेश अध्यक्ष गोविंदराव राऊत, तंटामुक्ती प्रदेश अध्यक्ष शांतीलाल कारंडे, सचिव सुनिल फंड, लॉन्ड्री कार्याध्यक्ष अनिल खडके (हुपरीकर), वरिष्ठ उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्या उपस्थितीत त्यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली.