दत्तात्रय भरणे मामांचे प्रमोशन ; माणिकराव कोकाटेंचे झाले डिमोशन
सोलापूर : विधानपरिषदेत मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ आणि वादग्रस्त वक्तव्ये यामुळे अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले असून त्यांना कृषी खाते मात्र गमवावे लागले आहे.
दत्ता भरणे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ या विभागांचा कार्यभार कोकाटेंकडे सोपवला आहे, तर भरणे यांच्याकडे कृषी खाते देण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून बदलाबाबत विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिसूचनेसाठी हा बदल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना कळविला. त्यानुसार रात्री तशी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.
कोकाटे सभागृहात मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी समोर आणल्याने कोकाटेंसह अजित पवार गटावरही चौफेर टीका झाली. हा वाद शमवण्याऐवजी तो भडकवणारी, चिथावणी देणारी वक्तव्ये त्यांनी केली होती. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना सक्त ताकीद दिली होती. अजित पवार यांनीही कोकाटे यांना समज दिली होती.