शौकत पठाण नाराज ! काही दिवस घरात बसणार ; सोलापूरच्या एमआयएम मध्ये काय चाललंय
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजातील उमेदवारीची मागणी करण्यात आली परंतु काँग्रेस पक्षाने या ठिकाणी मुस्लिम समाजाचा उमेदवार न देता शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेले अनेक काँग्रेसचे मुस्लिम नेते एमआयएम पक्षात गेले त्यामध्ये शौकत पठाण यांचा समावेश होता.
शौकत पठाण हे एम आय एम मध्ये आल्याने अशा नेत्याला खुद्द प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एका कार्यक्रमांमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून घोषणा केली.
खुद्द प्रदेशाध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्ष पद जाहीर झाल्याने शौकत पठाण यांनी आपल्या स्टाईलने कामाला सुरुवात केली होती पण त्यांना अधिकृत कोणतेही पत्र मिळाले नाही. त्यांनी पक्षाकडे पत्राची मागणी पण केली पण चार ओळीचे पत्र देण्यात पक्ष एवढा का मागे पुढे पाहतो आहे अशी चर्चा आता सोलापुरात सुरू आहे.
दरम्यान कुचंबना होत असलेल्या शौकत पठाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन नकळत पक्षावर असलेली आपली नाराजी बोलून दाखवली. कुणाचेही नाव न घेता एमआयएम पक्षातच राहणार आहे परंतु काही दिवस पक्षाचे काम करणार नाही, घरातच राहणार असे सांगताना त्यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळाला. जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र मिळत नसल्याने शौकत पठाण यांनी आपली नाराजी बोलून दाखवली असल्याने आता एमआयएम पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.