सोलापुरात महिला सावकाराच्या विरोधात गुन्हा ; उत्तर तालुक्यातील या गावातील आहे सावकार
उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलुर या गावात बेकायदेशीरपणे सावकारी करणाऱ्या महिलेविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात उपनिबंधक कार्यालयाने गुन्हा दाखल केला आहे. श्रीमती राणी मोहन जाधव राहणार हगलूर तालुका उत्तर सोलापूर असे त्या महिला सावकाराचे नाव आहे.
सावकारांचा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड व सावकारांचा सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक दत्तात्रय भवर यांचे मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख पी.आर. संकद, सहाय्यक ए.एस. पुजारी, सहाय्यक विक्रम गौड, सहाय्यक एस.बी. कासार यांच्या पथकाने हे कार्यवाही केली.
अर्जदार समर्थ दशरथ शिंदे यांचे तक्रार अर्जानुसार मौजे हगलूर तालुका उत्तर सोलापूर येथे अवैध सावकारी व्यवसाय करणा-या श्रीमती राणी मोहन जाधव यांची हगलूर येथील दिनांक ०७/०४/२०२५ रोजी घर झडती घेऊन अवैध सावकारीच्या अनुषंगाने त्यांचे घरामध्ये तक्रारदार यांचे वडिल कै. दशरथ दिगंबर शिंदे यांनी लिहून दिलेले रु.५० चे दोन स्टँप पेपर, व्याजाच्या नोंदी असलेले नोंद वहया इत्यादी दस्तऐवज आढळून आल्याने श्रीमती राणी मोहन जाधव हे वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारी व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 39 व 41 (ग) अन्वये सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 07/04/2025 रोजी पी. आर. संकद, मुख्य लिपीक यांनी शासकीय फिर्याद दाखल केलेली आहे.