ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या वतीने महिला खातेदाराचा सन्मान ; जयश्री माने यांच्या डोळ्यात अश्रू
सोलापूर (प्रतिनिधी) – केवळ जागतिक महिला दिन आहे म्हणून महिलांचा आदर सन्मान न करता स्त्रियांचा दररोज आदर केला पाहिजे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून अर्थकारण, बजेट, बचत हे महिलांकडून आपण शिकले पाहिजे असे मत माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले.
जागतिक महिला दिनानिमित्त ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या वतीने सोलापूर शहरातील १३ शाखेमधील खातेदार महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बी.एम.आय.टी. शिक्षण संकुलच्या सचिवा सौ.जयश्री माने, बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड, महिला संचालिका रुक्मिणी केंगार, प्रिया पाटील, संचालक सचिन चौधरी, श्रीकांत बंडगर, आनंदराव देठे, शावरप्पा वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाने महिला उदात्तीकरण धोरण, स्त्री – पुरुष समानता, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिल्यामुळे महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांना आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. अर्थकारण, उत्पन्न, खर्चाचे बजेट व बचत हे महिला शिवाय कोणालाही जमणार नाही म्हणून केवळ जागतिक महिला दिन आहे म्हणून मान-सन्मान नको, तर स्त्रीचा आदर हा दररोज करायला हवा असे माने यांनी सांगितले.
यावेळी जयश्री माने यांनी महिलांना कणखर आणि स्वावलंबी होण्याचे आवाहन करताना पुरुषांनी आपल्या पत्नीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे सांगतानाच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
सचिन चौधरी यांनी महिलांच्या कलागुणांचे कौतुक केले. प्रास्ताविक बँकेचे व्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांनी केले. आभार संचालिका प्रिया पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रशासन विभागाचे सुनील माळकदकर यांनी केले.
यावेळी सौ. जयश्री माने व माजी आमदार दिलीपराव माने यांचा हस्ते यलम्मा हणमंतु माढेकर (सिध्देश्वर पेठ), छाया लक्ष्मण हुच्चे (अशोक चौक), विनया विलासराव कार्यकर्ते (पार्क चौक), सुवर्णा चंद्रकांत कांबळे (दमाणी नगर), सविता राजराम देठे (एस.पी.एम.कॅम्पस् कुमठे), रुपाली विनोद कुलकर्णी (विजापूर रोड), परिणिता विजयसिंह शिंदे (कोंडी), लक्ष्मी ब्रह्मनाथ माळी (श्री.सिध्देश्वर मार्केट यार्ड), लिनाश्री मालाजी पाटील (बीएमआयटी कॅम्पस् बेलाटी), सोनाली मिलिंद शेटे (सुमित्रा पार्क), सविता गणपती पाटील (होटगी रोड), लक्ष्मी कृष्णप्पा सालोटगी (एस.आर.पी.कॅम्प), रेश्मा किरण डोंगरे (अंत्रोळीकर नगर) या महिलांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बँकेचे शाखाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मी 27 वर्षापासून बँकेची खातेदार असून बँकेच्या कर्मचाऱ्याकडून अतिशय चांगले व तत्पर सेवा मिळते. बँकेने ग्राहकाची विश्वासार्हता जपले असून अन्य ठिकाणी थोडेफार जादा व्याजदर असेल तरी ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँक अधिक सरस असल्याचे खातेदार यल्लमा माढेकर यांनी सांगितले.